मुंबई : भाजप नेते नारायण राणे यांनी ट्विटरवर पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. अतिवृष्टीची झळ सोसणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदत मिळावी, अशी मागणी राज्य सरकारकडून होत आहे. राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज (18 नोव्हेंबर) नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना राज्य सरकारने केंद्राला शेतकऱ्यांना मदतीसाठी तीन पत्र पाठवल्याची माहिती दिली. दरम्यान, केंद्राकडून मदत मागण्याच्या मुद्द्यावरुन नारायण राणे यांनी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर मिश्किल टिप्पणी केली आहे (Narayan Rane slams Maha Vikas Aghadi ministers).
“राज्य सरकारचा प्रत्येक मंत्री केंद्र सरकारकडे आर्थिक मदत मागतोय आणि मदत मिळाली नाही तर टीका करत आहे. थोडक्यात या सरकारची अवस्था ‘नाचता येईना आंगण वाकडे’ अशी झालीये. आगामी काळात हेच मंत्री स्वतःच्या जेवणाचा खर्चही केंद्राने द्यावा, अशी मागणी करतील”, असा टोला नारायण राणे यांनी लगावला (Narayan Rane slams Maha Vikas Aghadi ministers).
राज्य सरकारचा प्रत्येक मंत्री केंद्र सरकारकडे आर्थिक मदत मागतोय आणि मदत मिळाली नाही तर टीका करत आहे. थोडक्यात या सरकारची अवस्था ‘नाचता येईना आंगण वाकडे’ अशी झालीये. आगामी काळात हेच मंत्री स्वतःच्या जेवणाचा खर्चही केंद्राने द्यावा अशी मागणी करतील. @bjp4mumbai @BJP4Maharashtra
— Narayan Rane (@MeNarayanRane) November 18, 2020
विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
“अतिवृष्टीची झळ सोसणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडून मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारला तीनवेळा पत्र लिहिले. केंद्र सरकारने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पथक पाठवा, अशी विनंती पत्राद्वारे केली. पण भाजपवाले म्हणतात केंद्राकडे मदतीचा प्रस्तावच आला नाही. त्यामुळे आम्ही आणखी एक पत्र केंद्राला पाठवणार आहोत. भाजप लोकांमध्ये गैरसमज निर्माण करत आहे. शेतकऱ्यांची मतं मिळाली म्हणून तुम्ही केंद्रात आहात. मात्र त्यांनाच मदत दिली जात नाही “, असं विजय वडेट्टीवर म्हणाले होते.
महाराष्ट्रावर सगळ्यात मोठं संकट असताना केंद्र सरकार राज्यासोबत दुजाभाव करत असल्याची टीका मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज (18 नोव्हेंबर) केली आहे. महाराष्ट्रातील जनतेने भाजपला मते दिली नाहीत का? मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाचे (bjp) खासदार राज्यात निवडून आले. राज्यातही जनतेनं त्यांचे 105 आमदार निवडून दिले. पण तरीही भाजपने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे धोरण अवलंबल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
हेही वाचा :