अखेर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला आहे. मागच्या अनेक दिवसांपासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला होता. महायुतीमध्ये शिवेसना आणि भाजपा दोघांनी या मतदारसंघावर दावा केला होता. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी रखडली होती. आज राज्य सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी पत्रकार परिषदत घेतली. यावेळी सोबत त्यांचे बंधू किरण सामंत होते. किरण सामंत माघार घेत असल्याच उदय सामंत यांनी जाहीर केलं. उदय सामंत यांनी हे जाहीर करताच लगेचच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा मतदारसंघ मागच्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे होता. मागच्या दोन टर्मपासून इथून विनायक राऊत खासदार आहेत. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आता हा मतदारसंघ भाजपाकडे गेला आहे. नारायण राणे सुद्धा पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच आहेत.
नारायण राणे यांचा सामना आता विनायक राऊत यांच्याबरोबर होणार आहे. महाविकास आघाडीने विनायक राऊत यांना रत्नागिरी-सिंधुदुर्गातून उमेदवारी दिली आहे. मागच्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये या मतदारसंघावरुन पेच निर्माण झाला होता. उदय सामंत यांचे बंधु किरण सांमत रत्नागिरी-सिंधुदुर्गातून निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होते. किरण सामंत यांचे व्हॉट्स अप स्टेटसही मीडियामध्ये चर्चेचा विषय ठरले होते. किरण सामंत यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्यांना भेटीसाठी बोलावले होते.
नारायण राणे दोनदा हरले
उमेदवारी जाहीर होण्याच्याआधीच नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात प्रचार सुरु केला होता. नारायण राणे मोदी सरकारमध्ये मंत्री होते. त्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ मागच्याच महिन्यात संपला. त्यानंतर ते लोकसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरु झालेली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारने त्यांच्या बहुतांश राज्यसभा उमेदवारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. नारायण राणे यांचा 2014 मध्ये कुडाळ विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला. वैभव नाईक जायंट किलर ठरले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा वांद्रे विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला. नारायण राणे कोकणातील एक दिग्गज नेते आहेत. महाराष्ट्राच मुख्यमंत्रीपद भूषवलेले नारायण राणे आता पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. कोकणाला बॅरिस्टर नाथ पै, मधु दंडवते आणि सुरेश प्रभू अशी उच्च विद्याविभूषित खासदारांची परंपरा लाभलेली आहे.