नवी दिल्ली : जेव्हा मोदी फ्रान्स दौऱ्यावर गेले, तेव्हा करार झाला. त्यात अनिल अंबानी यांचं नावं होतं. देशाच्या संरक्षणमंत्र्यांनाही या कराराबाबत अंधारात ठेवण्यात आलं होतं. मोदी यांनी फ्रान्स आणि अनिल अंबानी यांच्यात दलाल म्हणून काम केलं, असा घणाघाती आरोप करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल घोटाळ्यावरुन निशाणा साधला. नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गाधी यांनी राफेल घोटाळ्यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली आणि त्यात एक ईमेलचा आधार घेत मोदींवर टीका केली.
“नरेंद्र मोदी हे फ्रान्स आणि अनिल अंबानी यांच्यात दलाल म्हणून काम करत होते. या ईमेलवरुन हे स्पष्ट झालंय. एअरबसच्या अधिकाऱ्याने पाठवलेल्या या ईमेलवरुन स्पष्ट झालंय की, अनिल अंबानी यांनी फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांची भेट घेतली. राफेल करारावर स्वाक्षरी होण्याच्या 10 दिवस आधीच अनिल अंबानींना राफेल कराराबाबत माहिती होती.” असा गौप्यस्फोट करत राहुल गांधी पुढे म्हणाले, “अनिल अंबानींना राफोल कराराबाबत 10 दिवस आधीच माहिती कशी मिळाली, याचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यायला हवं. संरक्षणमंत्री, एचएएल, परराष्ट्र सचिव यांनाही या कराराबाबत माहित नव्हतं, त्याआधीच अंबानींना माहिती होतं. हे खरं असेल, तर पंतप्रधान मोदींनी गोपनियतेचा भंग केला असून, त्यांच्याविरोधात कारवाई झाली पाहिजे.”
यावेळी राहुल गांधी यांनी कॅग रिपोर्टवरही निशाणा साधला. ते म्हणाला, “कॅगचा रिपोर्ट म्हणजे ‘चौकीदार ऑडिटर जनरल’ आहे.”
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत ईमेलची प्रत आणली होती. त्या ईमेलनुसार, उद्योगपती अनिल अंबानी यांची मंत्रालयात भेटीचा उल्लेख आहे. राफेल करारावर पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान सह्या करु, असेही म्हटलंय.
VIDEO :
BREAKING: Congress President @RahulGandhi exposes the lies in the Rafale deal. #ChowkidarChorHai https://t.co/r29BZgygZx
— Congress (@INCIndia) February 12, 2019