रायगड : मला वाटतं जास्तीत जास्त मुस्लीम समाजाने शिवसेनेसोबत यावं, असे आवाहन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅ. ए. आर. अंतुल यांचे सुपुत्र नविद अंतुले यांनी केले आहे. शिवसेनेने विकासाचा मुद्दा हाती घेतला असून, विकासाच्या दृष्टीने आघाडीसुद्धा घेतली आहे, असेही नविद अंतुले यांनी म्हटले आहे. रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील आंबेत येथे दिवंगत बॅ. ए. आर. अंतुले यांच्या निवासस्थानी झालेल्या शिवसेनेच्या मुस्लीम मेळाव्यात नविद अंतुले बोलत होते.
राजकारणामध्ये धर्म-समाज न मानणाऱ्या माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्या आंबेत येथील निवासस्थानी अनंत गिते यांच्या उपस्थीत शिवसेनेचा मेळावा पार पडला. मोठ्या संख्येने मुस्लिम महीलांसह नागरिकांनी या मेळाव्याला उपस्थिती लावली होती.
मुस्लिमांनी शिवसेनेसोबत यावं, काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाचं आवाहन https://t.co/BUoPeFde5y pic.twitter.com/tFCX7NsDWl
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 15, 2019
अनंत गीतेंची तटकरेंवर टीका
“कालपर्यंत ज्या कोणाला वाटलं होतं, मोहल्ले हे आमची जहागीर आहे, मुस्लीम समाज आमची वोट बँक आहे. आता ही जहागीरही त्यांची खालसा झाली आहे. वोट बँक ही नष्ट झालेली आहे.” असे म्हणत केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे रायगडचे उमेदवार अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि रायगडमधील उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला.
केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी सुनिल तटकरे यांचे नाव न घेता रायगडच्या दक्षिण भागातील सर्वात प्रभावशाली आणि सुनील तटकरेंची हक्काची वोट बँक असलेल्या मुस्लीम समाजाचा आंबेत येथे मेळावा घेऊन मुस्लीम समाजाला गृहीत न धरण्याचा इशारा दिला.
रायगडमध्ये ‘काँटे की टक्कर’
रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक चुरशीची ठरणार आहे. कारण इथून शिवसेनेकडून केंद्रीय मंत्री अनंत गीते पुन्हा एकदा रिंगणात आहेत, तर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे पुन्हा एकदा अनंत गीते यांना टक्कर देणार आहेत. गेल्यावेळी म्हणजे 2014 साली सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्यात लढत झाली होती. मात्र, सुनील तटकरे यांना केवळ सुमारे दोन हजार मतांनी निसटता परभाव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे यंदाची लढत अनंत गीते यांच्याशी अत्यंत आव्हानात्मक असेल.
सुनील तटकरे यांना आव्हान देण्यासाठी अनंत गीते यांनी थेट माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅ. ए. आर. अंतुले यांचे सुपुत्र नविद अंतुले यांना शिवसेनेत घेतले आहे. त्यामुळे सुनील तटकरे यांची हक्काची वोट बँक असलेल्या मुस्लीम समाजाची मतं शिवसेनेकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघातील यंदाची निवडणूक अत्यंत रंगतदार होणार आहे.