अमरावती : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी पुरस्कृत युवा स्वाभिमान पक्षाच्या अमरावती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नवनीत कौर राणा यांनी शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर हल्लाबोल केला. विद्यमान खासदारांनी केवळ 5 कामं सांगावी, मी माझी उमेदवारी मागे घेईन, असं जाहीर आव्हान नवनीत कौर राणा यांनी खासदार अडसूळांना दिलं.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने अमरावतीत नवनीत राणा यांना पाठिंबा दिला आहे. नवनीत कौर राणा यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उपस्थित होते.
यावेळी नवनीत कौर राणा म्हणाल्या, “गेल्या 9 वर्षांपासून मी या मतदारसंघात जीवाचं रान करुन, अमरावती जिल्ह्यात सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेत आहे. या राज्यात शेतकरी सुखी झाला पाहिजे. गेल्या 10 वर्षात या खासदारांनी काय विकास केला? या खासदारांनी केवळ 5 कामं सांगावी, मी माझी उमेदवारी मागे घेईन”
यावेळी जिल्ह्यात लाट चालणार नाही. विकास कशाला म्हणतात हे मी या खासदारांना दाखवून देईन. खासदार केवळ ट्रेनचे आकडे सांगत असतात, मात्र विकास काहीच दिसत नाही. यावेळी बाहेरचं पार्सल बाहेरच पाठवू, असा हल्लाबोल नवनीत कौर यांनी केला.
धनंजय मुंडेंचंही अडसूळांवर टीकास्त्र
महाराष्ट्रात एकमेव निष्क्रिय खासदार आहे, ते म्हणजे आनंदराव अडसूळ. नवनीतचा अर्थ नवीन स्पर्धा. नवनीत यांना दिल्लीला पाठविल्याशिवाय विकास होणार नाही, असं धनंजय मुंडे म्हणाले.
या सरकारने 125 कोटी जनतेला केवळ स्वप्नं दाखविले. मी एकही नरेंद्र मोदींचं भाषण विसरलो नाही. आता कुणी जर अच्छे दिन म्हटलं तर लोक हसतात. अच्छे दिनच्या नावाने 125 कोटी जनतेला फसवलं. 5 लाखाच्या नावानं फसवलं, अशी टीका धनंजय मुंडेंनी केली.
आता चौकीदार म्हणतो, सर कुछ भी बोलो मगर चौकीदार मत बोलें, असा टोमणा धनंजय मुंडेंनी लगावला.
धनंजय मुंडेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरही टीकास्त्र सोडलं. उद्धव ठाकरें एवढा दुबळा नेता मी बघितला नाही, कमला बाईचे पाय चाटत पुन्हा एकत्र आले, अशी घणाघाती टीका धनंजय मुंडेंनी केली.