मुंबई : 12 दिवसानंतर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांना अखेर बुधवारी जामीन मंजूर करण्यात आला. नवनीत राणा यांना मानेचा त्रास होऊ लागल्यानं त्यांना लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करण्यात आलं आहे. आज रवी राणा तळोजा कारागृहातून बाहेर पडल्यानंतर थेत लिलावती रुग्णालयात दाखल झाले. त्यावेळी पती रवी राणा यांना पाहिल्यानंतर खासदार नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले. रवी राणा यांनी नवनीत राणा यांना धीर दिल्याचं एक भावनिक चित्र लिलावती रुग्णालयात पाहायला मिळालं. दरम्यान, रवी राणा यांनी तळोजा जेल प्रशासनावर (Taloja Jail Administration) गंभीर आरोप केले आहेत. नवनीत राणा यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास सुरु झाला होता. त्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची विनंती जेल प्रशासनाला करण्यात आली. मात्र, तरीही त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं नाही, असा गंभीर आरोप रवी राणा यांनी केलाय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’समोर हनुमान चालिसाचं पठण करणार असं आव्हान खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दिलं होतं. त्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. शासकीय कामात अडथळासह राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर राणा दाम्पत्याला पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अखेर 12 दिवसांच्या जेलवारीनंतर राणा दाम्पत्याला बुधवारी जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, नवनीत राणा यांना मानेचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी नवनीत राणा यांची अवस्था वाईट असल्याचं पाहायला मिळत होतं.
जामीन मिळाल्यानंतर आज रवी राणा तळोजा कारागृहातून बाहेर आले. त्यावेळी ते थेट लिलावती रुग्णालयात दाखल झाले. तिथे भाजप नेते किरीट सोमय्या आधीच उपस्थित होते. त्यांनी आलिंगन देत रवी राणा यांचं स्वागत केलं. त्यानंतर रवी राणा पत्नी नवनीत राणा यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले. 12 दिवसांच्या जेलवारीनंतर नवरा-बायकोची भेट झाली. मात्र, त्यावेळी नवनीत राणा यांच्या अश्रूंचा बांध फुटल्याचं पाहायला मिळालं. नवनीत राणा बेडवर होत्या. रवी राणा यांना पाहताच त्यांना रडू कोसळलं. तेव्हा रवी राणा यांनी त्यांची गळाभेट घेतली आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
पत्नीची भेट घेतल्यानंतर रवी राणा यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी जेल प्रशासनाने आपल्याला आणि नवनीत राणा यांना कशाप्रकारे त्रास दिला याची कैफियत मांडली. तसंच नवनीत राणा यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास होत असल्याची तक्रार त्यांनी केली होती. मात्र, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं नाही, असा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला आहे.