नागपूर : आमदार रवी राणा आणि बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यातील वाद आता पुन्हा एकदा पेटला आहे. यावर रवी राणा (Ravi Rana) यांच्या पत्नी आणि खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “घरी मी त्यांची पत्नी, पण बाहेर मी केवळ एक लोकप्रतिनिधी, लोकसेवक आहे. त्यामुळे मी या विषयावर बोलणार नाही”, असं नवनीत राणा (Navneet Rana) म्हणाल्या.
लोकप्रतिनिधी म्हणून रवी राणा-बच्चू कडू यांच्यातील वादावर तुमची प्रतिक्रिया काय?, असा प्रश्न विचारला असता. मला या वादावर मला काही बोलायचं नाही. ते दोघे मला सिनियर आहेत. त्यांना माझ्यापेक्षा जास्त कळतं. त्यामुळे त्यावर मी काही बोलणार नाही. ते दोघे यासंदर्भात बोलतील, असं नवनीत राणा म्हणाल्यात.
रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटलाय. “मी सोशल मीडियावर रवी राणांचा व्हिडीओ पाहिला. त्यांनी घरात घुसून बच्चू कडूला मारणार असं विधान केलंय. मी त्यांना म्हटलं आहे, तू तलवार घेऊन येशील तर मी फूल घेऊन येईल. माझ्या शरीराचे किती तुकडे राणांना करायचे आहेत? मी निमुटपणे त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी, आणि पुन्हा महाराष्ट्राला सांगायचं आहे , या लढाईत आपण गुंतत गेलो तर शेतकऱ्यांची, दिव्यांग्यांची लढाई मागे पडेल. आणि पुन्हा त्याच्या मागे लागावं लागेल. त्यांचा तो हेतू असू शकेल”, असं म्हणत बच्चू कडू यांनी रवी राणा यांना इशारा दिला.
बच्चू कडू यांनी खोके घेतल्याचं विधान रवी राणा यांनी केलं. त्यानंतर बच्चू कडू यांनी अल्टिमेटम देत पुरावे सादर करण्याचं आव्हान दिलं. त्यानंतर त्यांच्यात बरेच आरोप प्रत्यारोप झाले. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर रवी राणा यांनी माफी मागतली आणि या वादावर पडदा पडला. पण आता पुन्हा एकदा हा वाद वाढण्याची शक्यता आहे.