नवी दिल्लीः एखाद्या खासदाराला किंवा लोकप्रतिनिधीला धमकीचे फोन येत असतील तर हे खरोखरच गंभीर आहे. राज्य सरकारने गांभीर्याने याची चौकशी करावी, असं वक्तव्य खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केलंय. नवी दिल्लीत राणा यांनी पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या नेत्यांवर आगपाखड करणाऱ्या नवनीत राणा यांनी प्रथमच संजय राऊत यांच्या वक्तव्याची दखल घेण्याचे वक्तव्य केलं आहे. चौकशी केल्यास हे कॉल खरोखर कुणाचे आहेत, हे कळेल, असेही राणा म्हणाल्या. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून मला धमकीचे फोन आल्याची माहिती आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली.
संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु असल्याने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा सध्या दिल्लीत आहेत. पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, ‘ धमकी कुणाला येत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. लोकप्रतिनिधीला थ्रेट करत असेल तर त्याची चौकशी अधिक गांभीर्याने घेतली पाहिजे, असे नवनीत राणा म्हणाल्या.
संजय राऊत यांचं हे वक्तव्य गांभीर्याने घ्यायचं की नाही, यावर बोलताना राणा म्हणाल्या, राऊत यांच्या वक्तव्यामागे नेहमी काही ना काही अजेंडा असतो. यावेळीही असेल. त्यामुळे या फोन कॉलची खरोखरच चौकशी झाली पाहिजे…
तर गुजरातमधील भाजपच्या विक्रमी विजयावरही नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून वारंवार परखड भूमिका मांडत असल्याने कन्नड रक्षण वेदिकेकडून मला धमकीचे फोन आल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय. राऊत यांनी स्वतःच आज पत्रकारांना ही माहिती दिली.
बेळगाव सीमावासियांवर अन्याय होताना शिंदे सरकार काहीच ठोस भूमिका घेत नाही, यावरून राऊत यांनी सरकारवर टीका केली. हे सरकार षंढ, नामर्द असल्याचं राऊत म्हणाले.
ही टीका जिव्हारी लागल्याने शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांना आता आवरा… नाही तर पुन्हा जेलमध्ये आराम करायला जावं लागले, असा इशारा दिला. तर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राऊत यांना इशारा दिला होता.
शंभूराज देसाई यांच्या पत्रकार परिषदेनंतरच कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मला फोन केले. माझ्यावर हल्ला झाला तर तो माझ्यावर नसून महाराष्ट्रावर झालेला हल्ला असेल असा इशारा राऊत यांनी दिलाय.