मुंबई : मुंबई ड्रग्स आणि आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणापासून नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि भाजपवर जोरदार टीका आणि आरोपांची मालिका सुरु ठेवलीय. पत्रकार परिषद आणि ट्विटरच्या माध्यमातून नवाब मलिक रोज नवे आरोप करताना गेल्या काही दिवसांपासून दिसून आले. आज मात्र, मलिक यांनी एक ट्विट करुन खळबळजनक आरोप केलाय. गेल्या काही दिवसांपासून काही लोक माझ्या घराची आणि शाळेची रेकी करत असल्याचा आरोप मलिकांनी केलाय. इतकंच नाही तर दोन व्यक्तींचे फोटोही मलिक यांनी ट्विट केले आहेत.
‘या गाडीतील हे लोक गेल्या काही दिवसांपासून माझं घर आणि शाळेची रेकी करत आहेत. कुणी यांना ओळखत असेल तर मला माहिती द्या. या फोटोतील लोकांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला माझी काही माहिती हवी असेल तर मला येऊन भेटा. मी सर्व माहिती देतो’, असं ट्विट मलिक यांनी केलं आहे. तसंच या ट्विटमध्ये त्यांनी दोन व्यक्तींचे फोटोही शेअर केले आहेत.
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 26, 2021
महाविकास आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा करतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आघाडी सरकार पडण्याची तारीखही जाहीर केलीय. राणेंच्या या भविष्यवाणीवर नवाब मलिक यांनी जोरदार टीका केलीय. काही लोकांकडे 23 वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता त्या कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचं भाकीत करावं लागतंय, असा जोरदार टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे. त्याचबरोबर सरकार पडेल ही भविष्यवाणी करुन देवेंद्र फडणवीस थकले. त्यानंतर चंद्रकांत पाटीलही बोलायचे. आता नारायण राणे यांनी भविष्यवाणीचं टेंडर घेतलं आहे, अशी टीकाही मलिकांनी केलीय.
काही लोकांकडे २३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता ‘त्या’ कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचं भाकीत करावंच लागतंय..#खंबीरसरकार#महाविकासआघाडीसरकार
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 26, 2021
भाजपाचा राष्ट्रवाद हा मनूवादी भूमिका जाहीर करणारा आहे. त्यांना समाजात पुन्हा वर्ण व्यवस्था आणि जातीभेद आणायचा आहे. हा बोगस राष्ट्रवाद असून तो कधीच आम्ही मान्य करणार नाही, असा घणाघातही मलिकांनी केलाय. राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाने संविधा दिना निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. यावेळी मलिक यांनी भाजपवर सडकून टीका केली. भारत एक धर्मनिरपेक्ष, समाजवादी लोकशाही व्यवस्था निर्माण करणारा देश राहिल. हा राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवाद आहे. आपला राष्ट्रवाद हा राज्यघटनेला बांधिल असणारा आहे. त्या राष्ट्रवादासाठी आपल्याला लढा दयायचा आहे, असंही मलिक म्हणाले.
इतर बातम्या :