मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना आज ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मलिक यांच्या अटकेनंतर आता राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री, नेते आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वर्षा निवासस्थानावरही महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचं मंत्री भुजबळ यांनी स्पष्ट केलंय. भुजबळ यांनी यावेळी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आणि महाविकास आघाडीतील मंत्री, नेते आणि कार्यकर्त्यांकडून राज्यभरात आंदोलन पुकारलं जाणार असल्याची घोषणा केलीय. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सुनील केदार उपस्थित होते.
इतकंच नाही तर आजच्या मलिकांवरील कारवाईनंतर महाविकास आघाडी आक्रमक भूमिका घेणार आहे. महाविकास आघाडीचे मंत्री आणि नेत्यांकडून भाजपविरोधात आंदोलन पुकारण्यात आलंय. ‘आता आम्ही सर्वजण बसलो होतो. आमी सर्वजण एकत्रितपणे कायदेशीररित्या जनतेत जाऊन मुकाबला करु. उद्या सकाळी 10 वाजता मंत्रालयाशेजारी महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आम्ही मंत्री निषेध म्हणून धरणं धरणार आहोत. तसंच परवापासून राज्यातील सर्व तालुका, जिल्हा, शहर पातळीवर शांतपणे मोर्चा आंदोलन, धरणं आम्ही करु’ असा इशारा भुजबळांनी दिलाय.
राजीनाम्याबाबत विचारलं असता भुजबळ यांनी मलिकांच्या राजीनाम्याबाबत स्पष्ट शब्दात नकार दिलाय. ‘राजीनामा देण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही. त्यांच्यावर गुन्हा अद्याप सिद्ध झालेला नाही. नारायण राणेंनाही अटक झाली होती, मग त्यांना राजीनामा मागितला गेला होता का? ते दोषी आहेत म्हणून न्यायदेवतेसमोर सिद्ध होत नाही तोवर राजीनाम्याचा प्रश्न नाही. आमच्या दृष्टीने त्यांनी चूक केलेली नाही. दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनाम्याची शिक्षा आम्ही तरी त्यांना देणार नाहीत. अनिल देशमुख, राठोड यांच्याबाबत जे झालं ते आता होणार नाही. राजीनाम्याचा आसूरी आनंद आम्ही भाजपला होऊ देणार नाही, असं भुजबळ म्हणाले.
भुजबळ पुढे म्हणाले की, ‘मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे की आज पहाटे आमचे सहकारी नवाब मलिक यांच्या घरी ईडीचे लोक गेले. काही तपास केला आणि नंतर त्यांना घेऊन ते ईडी कार्यालयात गेले. त्यानंतर जी काही चौकशी करुन कोर्टात त्यांना उभं केलं. आपल्याला कल्पना आहे की त्यावर युक्तीवाद झाला. एकूण काय तर 1992 सालचा एफआयआर, त्यावेळची घटना, 1999 साली त्या जागेचं अॅग्रीमेंट आणि त्यानंतर 12 वर्षांनी पीएमएलएचा जन्म झाला. या तीस वर्षात नवाब मलिक यांचं नाव कुणीही कुठेही घेतलं नाही. पण आता मलिक हे सातत्याने भाजप विरोधात बोलतात किंवा जांच्यावर अन्याय होतो त्याबाबत ते निडरपणे बोलतात. तर त्यांचं तोंड बंद करण्यासाठी हा सर्व प्रकार आहे’.
‘एफआयआर झाल्याशिवाय पीसीआर होत नाही म्हणून फेब्रुवारीमध्ये एक एफआयआर केला गेला. त्याचा संदर्भ घेऊन मलिकांना अटक केली आणि त्यांच्यावर आरोप केले गेले. मलिक यांनी हे आरोप फेटाळले आहेत. त्यातही सलीम पटेल म्हणून सांगतात त्यावर वकील देसाईंनी सांगितलं की तो सलीम फ्रुट वेगळा आहे. सलीम फ्रुटही वारला आणि हसिना पारकरही वारल्या. आता वडाची साल पिंपळाला वापरायची. दबाव निर्माण करायचा, यासाठी हा सर्व प्रकार सुरु आहे. हा प्रकार निषेधार्ह आहे. हे वागणं लोकशाही विरोधी आहे. जो बोलेल त्याचं तोंड बंद करण्याचा हा प्रकार आहे. हे लोकशाहीला अजिबात शोभा देणारं नाही’, अशी जोरदार टीका भुजबळ यांनी भाजपवर केलीय.
इतर बातम्या :