मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मलिकांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीच्या गोटात मोठी खळबळ माजली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे असे प्रमुख नेते उपस्थित आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत. महत्वाची बाब म्हणजे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे देखील शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळतेय.
नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर ते नैतिकतेच्या मुद्द्यावरुन राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशावेळी नवाब मलिक यांच्या ताब्यातील खातं कोणत्या मंत्र्याकडे देण्यात यावं याबाबत सिल्व्हर ओकवरील बैठकीत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मलिक यांच्याकडे खात्याचा अतिरिक्त पदभार मंत्री हसन मुश्रिफ, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब पाटील किंवा अन्य कोणत्या नेत्याकडे दिला जावा यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
नवाब मलिक हे तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयाबाहेर आले. त्यावेळी त्यांनी माध्यमांना व्हिक्टरी साईन दाखवली. लढेंगे आणि जितेंगे डरेंगे नही, असं नवाब मलिक यांनी माध्यमांना सांगितलं आहे. नवाब मलिक यांचं जेजे रुग्णालयात अर्धा तास मेडिकल होईल. त्यानंतर न्यायालयात सुनावणी होईल, अशी माहिती आहे.
Main jhukega nahi! #WeStandWithNawabMalik pic.twitter.com/c5qfBN6OS0
— Office of Nawab Malik (@OfficeofNM) February 23, 2022
‘भाजपमध्ये प्रवेश करुन किंवा भाजपमध्ये राहून आपले घोटाळे लपले जातात, हा ओव्हर कॉन्फिडन्स अनेक भाजपच्या भ्रष्ट नेत्यांना झाला आहे. केंद्रीय यंत्रणा वापरून विरोधकांवर दबाव टाकायचे राजकारण आज सुरु आहे. तरीही जनता मात्र भाजप नेत्यांचा भ्रष्टाचार विसरलेली नाही’, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आली आहे.
भाजपमध्ये प्रवेश करुन किंवा भाजपमध्ये राहून आपले घोटाळे लपले जातात, हा ओव्हर कॉन्फिडन्स अनेक भाजपच्या भ्रष्ट नेत्यांना झाला आहे. केंद्रीय यंत्रणा वापरून विरोधकांवर दबाव टाकायचे राजकारण आज सुरु आहे. तरीही जनता मात्र भाजप नेत्यांचा भ्रष्टाचार विसरलेली नाही. pic.twitter.com/PDFtI2nxVR
— NCP (@NCPspeaks) February 23, 2022
इतर बातम्या :