मुंबई : केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलाय. त्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिलं. तपास यंत्रणाचा गैरवापार केला असता तर अर्धे मंत्रिमंडळ तुरुंगात असते, असं फडणवीस म्हणाले. फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी फडणवीसांना आव्हान दिलंय. ‘अर्धे काय पूर्ण टाका ना मंत्रीमंडळ तुरुंगात…आम्ही कुणाला घाबरणार नाही’, असा स्पष्ट इशारा नवाब मलिक यांनी फडणवीसांना दिलाय. (Nawab Malik’s reply to Devendra Fadnavis’s criticism on CM Uddhav Thackeray)
सत्तेचा गैरवापर करायचा असेल तर तुम्ही कितीही लोकांना तुरुंगात टाकू शकता परंतु आम्ही घाबरणार नाही. भ्रष्टाचाराचे आरोप करत असताना त्यांनी सावधपणे आरोप केले पाहिजे असे सांगतानाच ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’ असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला. दरम्यान बरेचसे उंदीर आम्ही काही दिवसातच बाहेर काढू, असा सूचक इशाराही मलिक यांनी फडणवीस आणि भाजपला दिलाय.
इंग्रजांच्या जुलमी अत्याचाराच्या विरोधात लाल-बाल-पाल यांनी क्रांती केली तीच क्रांती भाजपप्रणीत केंद्रसरकारच्या विरोधात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि पंजाब या तीन राज्यातून उभी राहिल असा विश्वासही मलिकांनी व्यक्त केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात लाल-बाल-पाल या तीन क्रांतीकारकांचा उल्लेख केला होता. त्यावर बोलताना मलिक यांनी भाजपचे हे जुलमी सरकार उलथवायला ही तीन राज्ये कारणीभूत ठरणार आहेत असं स्पष्ट केलं.
राज्याचे अधिकार जिथे विरोधकांचे सरकार आहे तिथे केंद्रसरकार यंत्रणेचा वापर करून खोट्या केसेस बनवून बदनाम केले जात आहे. जे सनदी अधिकारी आहेत ज्यांचा पीएमओमधून कंट्रोल असतो त्या अधिकार्यांवर दबाव आणून सरकारला अडचणीत आणण्याचा खेळखंडोबा हा देशभर सुरू आहे. विशेष करुन पश्चिम बंगाल व महाराष्ट्रात असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
पश्चिम बंगालमधील जनतेने भाजपला दाखवून दिले आहे तर महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे ती दाखवून देईल. तर पंजाबमधूनही क्रांतीला सुरुवात झालीय. जुलमी केंद्र सरकारच्या विरोधात या तीन राज्यात वणवा पेटणार आहे. या परिवर्तनाच्या लढाईत जनता आमच्यासोबत असेल असेही नवाब मलिक म्हणाले.
ईडीच्या कारवायांवरून मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला होता. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मोदी एजन्सींचा वापर करण्याच्या विरोधात आहेत. ते कधीच एजन्सीचा गैरवापर करत नाहीत. आम्ही यंत्रणांचा गैरवापर केला असता तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात असतं, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.
आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे लोक आहोत. मागच्या काळात काँग्रेस आणि इतरांनी एजन्सींचा दुरुपयोग केला. आम्ही तसा गैरवापर केला नाही. पण एक गोष्ट नक्की आहे. भ्रष्टाचार खणून काढल्याशिवाय मोदी स्वस्थ बसणार नाही. भ्रष्टाचार केला असेल त्यांनी घाबरावं. ज्यांनी केला नाही त्यांनी घाबरू नये, असंही फडणवीस म्हणाले.
इतर बातम्या :
उद्धव ठाकरे म्हणाले सरकार पाडून दाखवा, फडणवीस म्हणतात, पडेल तेव्हा कळणारही नाही!
आम्हाला आता उद्धवजींमध्ये राहुल गांधी स्पष्ट दिसू लागलेयत; नितेश राणेंचा खोचक टोला
Nawab Malik’s reply to Devendra Fadnavis’s criticism on CM Uddhav Thackeray