Ajit Pawar (रणजीत जाधव) | महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. सोबत असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मानजनक जागा देऊन समाधानकारक तोडगा कसा काढायचा हे भाजपासमोरच आव्हान आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जागा वाटपाच्या चर्चेत असताना अजित पवार यांना आज एक मोठा झटका बसणार आहे. त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांसह 137 जण एकाचवेळी शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. लोणावळ्यात आज शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा पार पडणार आहे.
लोणवळ्यातील अजित पवार गटातील राष्ट्रवादी युवक शहराध्यक्षासह 137 जणांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हस्तक्षेप केल्याने नाराजी व्यक्त करत सर्वांनी राजीनामा दिला. अजित पवार यांच्या पक्षाच्या मावळमधील आणि पुणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ज्यांनी राजीनामा दिला, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण तरीही राजीनामा देणारे आपल्या निर्णयावर ठाम राहिले.
शरद पवारांच जोरदार स्वागत
आज लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शरद पवार यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. जेसीबीमधून फुलांची उधळण करण्यात आली. सोबत प्रतिभा पवारही होत्या. क्रेनवर मोठा हार लावण्यात आला होता. तुतारी वाजवण्यात आली. ढोल-ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आलं.
आमच्या पक्षाचे मालक शरद पवारच
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना बहाल केलं. पण आमच्या पक्षाचे मालक शरद पवारच आहेत. हे दाखवण्यासाठी लोणावळ्यात “वेळ पण तीच, मालक पण तोच” ही नवीन टॅग लाईन समोर आणण्यात आलीय.