अजित पवार गटातील बड्या नेत्यांच्या शरद पवार यांच्यासोबत भेटीगाठी, राजकारणाचा नवा अंक बघायला मिळणार?

| Updated on: Sep 30, 2024 | 9:17 PM

शरद पवार आता कामाला लागले असून, अजित पवार आणि भाजपला धक्का देण्याच्या हालचालीही सुरु झाल्या आहेत. अजित दादांचे आमदार आणि नेते उघडपणे शरद पवारांना भेटत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात मोठ्या हालचाली घडण्याचे संकेत मिळत आहेत.

अजित पवार गटातील बड्या नेत्यांच्या शरद पवार यांच्यासोबत भेटीगाठी, राजकारणाचा नवा अंक बघायला मिळणार?
शरद पवार, अजित पवार
Image Credit source: Facebook
Follow us on

माढ्याचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदेंनी शरद पवारांची पुण्याच्या मोदी बागेत भेट घेतली. भोसरी विधानसभा मतदारसंघातून इच्छूक असलेले विलास लांडेही शरद पवारांना भेटले आहेत. दौंडचे रमेश आप्पा थोरातांनी शरद पवारांची भेट घेवून, कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची घोषणा केली. तर चंदगडचे शिवाजीराव पाटीलही शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. या भेटीगाठीवरुन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर जहरी टीका केली. “शरद पवार दीड महिन्यांनी सुप्रिया सुळेंसाठी आपला पक्ष, भाजप किंवा काँग्रेसमध्ये विसर्जित करतील”, असं पडळकर म्हणाले आहेत.

येत्या 10 दिवसांत विधानसभा निवडणुकीची घोषणा होईल. त्यामुळे ज्या ठिकाणी मित्रपक्षांचे विद्यमान आमदार आहेत, तिथं तिकीट मिळणार नसल्यानं अजित पवारांचे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्यासाठी इच्छुक आहेत. माढ्यातून आमदार आहेत, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बबनदादा शिंदे. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून लढण्यापेक्षा त्यांची शरद पवारांच्या तुतारी चिन्हावर लढण्याची इच्छा असल्याची माहिती आहे. परवाच बबनदादांचे पुतणे धनंजय शिंदेंनीही माढ्यातून शरद पवारांची भेट घेत तिकीट मागितलं आहे.

विलास लांडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते असून ते भोसरीतून इच्छूक आहेत. मात्र भोसरीतून भाजपचे महेश लांडगे विद्यमान आमदार असल्यानं इथून तिकीट मिळणार नाही, असं विलास लांडेंना वाटत आहे. त्यामुळे त्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे कल आहे. दौंडचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रमेश आप्पा थोरातांनी तुतारी हाती घेण्याची घोषणाच केली आहे. दौंडमधून भाजपचे राहुल कुल आमदार आहेत, त्यामुळे थोरातांना इथून तिकीट मिळण्याची शक्यता नसल्याने ते तुतारी हाती घेणार आहेत.

चंदगडचे भाजपचे शिवाजीराव पाटलांचाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत संपर्क झाल्याची माहिती आहे. चंदगडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेश पाटील विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे तिकीट मिळणार नसल्याच्या शक्यतेनं भाजपचे शिवाजीराव पाटील तुतारी हाती घेवू शकतात. तर सर्वांनाच शरद पवार घेणार नाहीत, निष्ठावंतांनाही तिकीटं द्यायची असल्यानं ठराविक चेहरे घेतले जातील, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत, महाविकास आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स शानदार राहिला आहे. त्यामुळे जागा वाटपात काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा कमी जागा आल्या तरी अधिक आमदार निवडून आणण्याचं उद्देश शरद पवारांचं आहे. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्येही त्यांनी हे स्पष्ट केलं आणि मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आधीच घोषित होणार नाही हेही पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना सांगितलं आहे.

शरद पवार अनौपचारिक गप्पांमध्ये काय म्हणाले?

  • 1. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय आमदार निवडून आल्यानंतर घेऊ
  • 2. राज्यात सरकार आणणं हेच आमचं लक्ष्य
  • 3. ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे अशा जागा अदलाबदलही होवू शकतात
  • 4. जेवढ्या जागा निवडून येवू शकतात तेवढ्या जागा प्रत्येक पक्षाला जातील
  • 5. आम्ही जसं सरकार आणण्याची काळजी घेतोय तसं सत्ताधारीही घेत आहेत
  • 6. विधानसभेला आमचं तुतारी वाजवणारा माणूस हेच चिन्ह राहील
  • 7. अमित शाह म्हणाले बूथ लेवलवरील कार्यकर्ता फोडा
  • 8. शाहांनी महाराष्ट्रात आणखी सभा घ्याव्यात म्हणजे आम्हाला फायदा होईल

2019च्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात काँग्रेस विशेषत: राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला होता. आता, घड्याळाचे काटे उलटे फिरताना दिसत असून, अजित पवारांची राष्ट्रवादी तसेच भाजपच्या नेत्यांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत इनकमिंग होऊ शकते.