“छगन भुजबळांची भूमिका दुटप्पी”, शरद पवार गटाच्या नेत्याचा संताप, म्हणाले “परतीचे प्रयत्न केले तरी…”

| Updated on: Jul 15, 2024 | 4:12 PM

"शरद पवार हे सध्या आजारी आहेत. त्यांची तब्ब्येत ठीक झाली की ते नक्कीच याप्रकरणी मार्गदर्शन करतील", असेही ते म्हणाले.

छगन भुजबळांची भूमिका दुटप्पी, शरद पवार गटाच्या नेत्याचा संताप, म्हणाले परतीचे प्रयत्न केले तरी...
Follow us on

Anil Deshmukh on Chhagan Bhujbal Sharad Pawar Meet : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. छगन भुजबळ आणि शरद पवारांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. शरद पवार आजारी असल्याने त्यांची भेट घेण्यासाठी आलो होतो, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली होती. आता यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भुजबळांचे नाव घेत जबरदस्त टोला लगावला.

आधी टीका, नंतर विनंती 

“भुजबळ साहेब दुटप्पी भूमिका घेत आहेत. एकीकडे बारामतीला टीका करायची आणि नंतर पवार साहेबांना आज भेटायला जाऊन आपण मार्गदर्शन करा असं सांगायचं ही दुटप्पी भूमिका आहे. काल राजकीय भाषण करत जोरदार टीका केली. पण आज राज्य शासनातर्फे विनंती करत आहे, हे सुरु आहे. त्यांनी परतीचे प्रयत्न केले तरी त्यांना परत घेणार नाही ही आमच्या पक्षाची भूमिका आहे”, असे अनिल देशमुख म्हणाले.

“एकनाथ शिंदे मराठा नेत्यांना आणि देवेंद्र फडणवीस ओबीसी नेत्यांना आश्वासने देत आहेत. गेल्या वर्षभरात या दोन्ही समाजाला काय काय आश्वासने दिली आहेत ते सांगायला हवे. आम्हाला वर्षभरात काय चर्चा केली, याची सविस्तर माहिती दिली नाही. त्यानंतर चर्चेला बोलावले. त्यामुळे त्यांनी याबद्दल आधी माहिती द्यायला हवी होती. त्यामुळे वर्षभरात त्यांची कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली, तसेच त्यांना काय आश्वासने दिली, हे सांगायला हवे”, असेही अनिल देशमुखांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

“भाजपचा काहीही भरोसा नाही”

“शरद पवार हे सध्या आजारी आहेत. त्यांची तब्ब्येत ठीक झाली की ते नक्कीच याप्रकरणी मार्गदर्शन करतील”, असेही अनिल देशमुख म्हणाले.

“सध्या अजित पवारांच्या आमदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत ते अजित पवार गटाला स्वतंत्र लढायला लावू शकतात. भाजपचा काहीही भरोसा नाही. ते वेळेवर आम्हाला काढायला लावतील, अशी चर्चा सध्या अजित पवारांच्या आमदारांमध्ये आहे”, असेही अनिल देशमुखांनी सांगितले.

छगन भुजबळ काय म्हणाले?

दरम्यान शरद पवारांची भेट घेतल्याने छगन भुजबळांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी या भेटीमागचे कारण सांगितले. मी आज शरद पवार साहेबांकडे सकाळीच गेलो होतो. त्यांची वेळ घेतली नव्हती. ते आजारी असल्याचं कळलं होतं. सव्वा दहा वाजता गेलो होतो. ते तब्येत बरी नसल्याने झोपले होते. त्यामुळे मी एक दीड तास थांबलो. ते उठले आणि मला बोलावलं. ते बिछान्यावरच झोपलेले होते. तब्येत बरी नव्हती. मी बाजूला खुर्ची ठेवून बोलत होतो. दीड तास चर्चा केली. मी कोणतंही राजकारण घेऊन आलो नाही. मंत्री आणि आमदार म्हणून आलो नाही. पक्षीय भूमिका नाही, असे छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेदरम्यान म्हटलं.