उद्धव ठाकरे आणि अमोल कोल्हे यांची बॅग तपासण्यात आली, त्यावरुन आता राजकारण सुरु झालं आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार या विषयावर बोलले आहेत. “माझ्यापण बॅग तपासल्या. मी परभणीला असताना माझ्या बॅगा तपासल्या. निवडणूक आयोगाला तो अधिकार आहे. मागे लोकसभेला मुख्यमंत्र्यांच्या बॅग तपासल्या. विरोधकांनी तक्रार केली, पोलिसांच्या मदतीने या गोष्टी होतात. आमच्याबरोबर पोलिसांच्या गाड्या असताना त्यांच्या गाड्या तपासा आणि आमच्याही गाड्या तपासा” असं अजित पवार बोलले. “मी या निवडणुकीत सोशल इंजिनिअरींग केलं आहे. 12.50 टक्के जागा आदिवासींना, 12.50 टक्के जागा मागासवर्गीयांना, 10 टक्के जागा अल्पसंख्यांकांना आणि 10 टक्के जागा महिलांना दिल्या” असं अजित पवार म्हणाले.
“निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे. जे बोलतो तसं वागतो, निवडणूक शेवटच्या टप्प्यात असताना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून आम्ही आमची भूमिका मांडू” असं अजित पवार म्हणाले. “राज्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहेच. पण प्रत्येक जागा लढवताना पाच वर्षात काय केलं? पुढच्या पाच वर्षात काय करणारं? हे सांगितलय. बारामतीमधील प्रत्येक गावासाठी जाहीरनामा दिलाय. पाच वर्षात काय केलं? पुढच्या पाचवर्षात काय करणार? हे सांगितलय” असं अजित पवार म्हणाले.
‘लोकांना फार नकारात्मक बोललेलं आवडत नाही’
महायुतीचे घटक असलेल्या रवी राणांच्या वक्तव्यावर सुद्धा अजित पवार बोलले. अमरावतीची एक जागा निवडून आली नाही तर काही होत नाही असं वक्तव्य रवी राणा यांनी केलं होतं. त्यामुळे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रवी राणांना अजित पवारांनी चांगलेच फटकारल्याच पाहायला मिळालं. “ती विनाशकाले विपरित बुद्धी. याबद्दल न बोललेलं बरं. त्याच्या बोलण्यामुळे तो स्वत:च्या पत्नीच्या पराभवाला कारणीभूत ठरला. लोक काहीही बोलत असतात. प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायचं नसतं. लोकांना फार नकारात्मक बोललेलं आवडत नाही. जनता सकारात्मक विचार करत असते. मी पण विधानसभेला दोनदा रवी राणाच समर्थन केल. काय बोलावं हा त्याचा अधिकार आहे. आम्ही चांगल्या मताधिक्क्याने विजयाचा प्रयत्न करणार. मला आनंदराव अडसूळ भेटले. तिथे त्यांच्याविरोधात काम करतोय. हे बरोबर नाही. देवेंद्र फडणवीसांनी त्याला योग्य पद्धतीने समजावलं पाहिजे. महायुतीत कुठेही अंतर पडणार नाही. कारण नसताना गैरसमज निर्माण होणार नाही ही काळजी घेतली पाहिजे. वाचाळवीरांनी वाचाळपणा बंद केला पाहिजे” असं अजित पवार म्हणाले.