महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मतदानाआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पाच वर्षांपूर्वी गौतम अदानी, भाजप आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची एक बैठक झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध होता. 2019 विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर जे घडलं, ते अजित पवारांनी सांगितलय. अजित पवार यांनी त्यावेळी पहिल्यांदा भाजपासोबत सरकार बनवलं होतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्री बनले होते. अजित पवार यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, “अमित शाह, गौतम अदानी, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस आणि पवार साहेब सगळेच त्या बैठकीला हजर होते”
NCP आणि भाजपामधल्या वैचारिक मतभेदाच्या मुद्यावर अजित पवार म्हणाले की, “2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपा सरकारला बाहेरुन पाठिंबा दिला होता. विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर एनसीपीचे प्रवक्ते प्रफुल्ल पटेल यांनी भाजपाला बाहेरुन पाठिंबा देत असल्याच जाहीर केलं होतं” ‘हे समर्थन कायमस्वरुपी नाही असं राष्ट्रवादीने नंतर स्पष्ट केलं होतं’, असं अजित पवार म्हणाले.
शरद पवार मग भाजपासोबत का नाही गेले?
“दिल्लीत एका व्यापाऱ्याच्या घरी बैठक झाली, हे सर्वांना माहित आहे. पाच बैठका झाल्या. अमित शाह, गौतम अदानी तिथे होते. प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस, पवार साहेब सुद्धा होते. सर्व निर्णय झाले होते” असा अजित पवार यांनी खुलासा केला. ‘आरोप माझ्यावर झाले. मी मान्य केले. इतरांना सेफ केलं’ असं अजित पवार म्हणाले. शरद पवार मग भाजपासोबत का नाही गेले? यावर अजित पवार म्हणाले की, “या प्रश्नाचं उत्तर मला माहित नाही. शरद पवार ते नेते आहेत, त्यांच्या डोक्यात काय चाललय? हे कोणाला समजू शकत नाही, अगदी त्यांच्या पत्नीला सुद्धा नाही”
‘बैठकीत गौतम अदानी काय करते होते?’
अजित पवारांच्या या वक्तव्यावर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाने प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी विचारलं की, ‘बैठकीत गौतम अदानी काय करते होते?’. “महाविकास आघाडीच सरकार पाडण्यात अदानींचा हात होता. त्यांना धारावी आणि अन्य काही प्रकल्प हवे होते. हे महाराष्ट्र सरकार नाही, अदानी सरकार आहे. सत्य सगळ्यांसमोर आहे” असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
2017 ते 2019 दरम्यान शरद पवारांच्या भाजपासोबत बैठका का?
2019 मध्ये सरकार बनवण्यासाठी भाजपासोबत चर्चा केल्याचे दावे शरद पवार यांनी नेहमीच फेटाळले आहेत. “2017 ते 2019 दरम्यान शरद पवार यांनी भाजपासोबत अनेकदा बैठका केल्या” असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी मागच्यावर्षी केला होता.
पवार कुटुंब एकत्र येणार का?
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटण्याचा काही प्रश्नच नाहीय. ज्यांच्याकडे जास्त आमदार आहेत, त्याचं पक्षावर नियंत्रण आहे. पवार कुटुंब एकत्र येणार का? अजून आम्ही यावर विचार केलेला नाही. सर्व लक्ष निवडणुकीवर आहे” असं अजित पवार यांनी उत्तर दिलं.