बंगळुरू: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली. बोम्मई यांच्या विनंतीवरून त्यांची भेट घेतल्याचं ट्विट पवार यांनी केलं आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पवारांच्या भाजप नेत्याशी सुरू असलेल्या भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण आलं आहे. (NCP Chief Sharad Pawar calls on CM Bommai in Bengaluru)
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बेंगळुरूमध्ये आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री बोम्मई यांची भेट घेतली. पवार यांनीच ट्विट करून ही माहिती दिली. मी आज बंगळुरूमध्ये होतो. त्यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा मला फोन आला. त्यांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांचं पद पाहता मी त्यांना भेटण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्याशी माझी भेट झाली. त्यांनी माझं चांगलं आदरतिथ्य केलं. महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्य गेल्या अनेक वर्षापासून परस्पर सहकार्याने काम करत आले आहेत. त्यामुळे यापुढेही ही परंपरा कायम राहील अशी आशा आहे, असं पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
या भेटीत विकासाच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. कृषी, सहकार आणि पाणी प्रश्न या महत्त्वाच्या मुद्द्यांवर या भेटीत चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच अलमट्टीच्या पाण्याबाबतही या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जातं. बोम्मई यांनी नुकतीच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे या भेटीत प्रशासकीय कामकाजाच्या अनुषंगानेही चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं वृत्त आहे.
शरद पवारांनी गेल्या काही दिवसात, अल्पकाळात अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. शरद पवार हे 17 जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना भेटले होते. त्यानंतर वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी शरद पवारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात 17 जुलैला पंतप्रधान कार्यालयात भेट झाली होती. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली होती. लोकसभेचं पावसाळी अधिवेशन आणि नव्या सहकार खात्याची निर्मिती या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती.
दरम्यान, शरद पवारांनी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. गेल्याच आठवड्यात नितीन गडकरी आणि शरद पवार यांचीही भेट झाली होती. नितीन गडकरी यांनी शरद पवारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती.
3 ऑगस्ट रोजी पवारांनी नवे सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीत सहकाराशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच इथनॉलच्या धोरणावरही या बैठकीत चर्चा झाली. यावेळी पवारांनी शहा यांना पुणे भेटीचं निमंत्रणही दिलं होतं. (NCP Chief Sharad Pawar calls on CM Bommai in Bengaluru)
I am thankful for his warm hospitality and hoping that the two states would continue to work together with a Cooperative vision in the years to come.@CMofKarnataka@BSBommai #BangaloreVisit pic.twitter.com/tE6pPuytyJ
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 6, 2021
संबंधित बातम्या:
आधी तटकरेंच्या उपस्थितीत शरद पवार-अमित शाहांची बैठक, मग तटकरेंशिवाय वेगळी चर्चा!
शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले, दोन्ही नेत्यांमध्ये तासभर खलबतं
“पूर्वी शरद पवार नरेंद्र मोदींना भेटले, महाराष्ट्रात 80 तासांचं सरकार बनलं, आता काय होईल?”
(NCP Chief Sharad Pawar calls on CM Bommai in Bengaluru)