मुंबई : एस.टी कामगारांच्या एकूण 22 संघटनांच्या कृती समितीन शरद पवारांसोबत बैठक घेतली. अनिल परबही या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर एसटी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी कर्मचाऱ्यांना कामावर तत्काळ रुजू होण्याचं आवाहन केलं. प्रतिनिधींचं बोलून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी एसटी कर्मचाऱ्यांमध्ये काही लोकांनी गैरसमज पसरवल्यामुळे हा संप इतका लांबला गेला, अशी टीका त्यांनी केली. दरम्यान एस.टी कर्मचाऱ्यांबाबत आज सरकार इतक सकारात्मक का झालं, यावरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सह्याद्री अतिथी गृहावर झालेल्या बैठकीनंतर शरद पवार यांनी म्हटलंय, की संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी एकदा प्रवाशांचाही विचार करावा. एसटी संपाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. पण काहींनी एसटी कर्मचाऱ्यांमध्ये गैरसमज पसरवला. सरकार एसटी कर्मचाऱ्याचं म्हणणं ऐकून घ्यायला तयारच नाही, असा गैरसमज पसरवला गेला. मला इथं राजकारण करायचं नाही. मला प्रश्न सोडवायचं आहे. ज्यांना राजकारण करायचं, त्यांनी राजकारण करावं, माझ्या हा प्रश्न सुटणं जास्त महत्त्वाचं आहे. काहींना याबाबत गैरसमज पसरवले आहेत. मात्र ज्यांनी दिशाभूल केली त्यामुळेच हा संप चिघळला गेला, असंही शरद पवार यांनी म्हटलंय.
सरकार एसटी संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सकारात्मक आहे. पण एसटी बंद ठेवून हा प्रश्न सुटणार आहे. एसटी रस्त्यावर धावली पाहिजे. पगारवाढ, विलीनीकर यावरही शरद पवार यांनी महत्त्वाची वक्तव्य केली. एसटीच्या विलिनीकरणाचा मुद्दा हा न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे त्यावर बोलणं योग्य नाही, असं शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. दरम्यान, यावेळी एसटी कामगार संघटनांसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेतून निश्चित तोडगा निघेल आणि सरकार एसटी कर्मचाऱ्यांचे सगळे प्रश्न चर्चेतून सोडवेल, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलाय.
एसटी चालू झाली पाहिजे, असा आग्रह यावेळी बैठकीत सगळ्यांनी मांडला. दरम्यान, एसटी संपामुळे दोन महिने प्रवाशांचे मोठे हाल झाले. एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होऊन त्यांच्यावरील कारवाईबाबतचा लढा द्यायला हवा होता, त्यातून निश्चितच मार्गही निघाला असता, असंही पवारांनी यावेळी म्हटलंय.
मला आनंद आहे कृती समितीच्या संघटना प्रतिनिधींनी कामगारांच्या हिताबद्दलच जितकी आस्था आहे, त्यासोबत प्रवाशांचं हित आणि एसटी टिकली पाहिजे याही बद्दल कामगार संघटनांच्या लोकांचा आग्रह आहे. त्यामुळे त्यांचाही एकंदर दृष्टीकोन सकारात्मक आहे. या सकारात्मक दृष्टीकोनातूनच त्यांनी महाराष्ट्रभरातील एसटी कामगारांना आवाहन केलंय. माझी विनंती आहे, शेवटी आपली बांधिकली प्रवाशांशी आहे. ही बांधिकली जपली पाहिजे. याबाबत गांभीर्यानं विचार करत एसटी कशी सुरु होईल, याबाबत काळजी घ्यावी, एवढंच मला सुचवायचं, असं शरद पवार म्हणालेत.