शरद पवार यांनी मार्ग काढला, राहुल गांधी यांचं वादग्रस्त विधान, उद्धव ठाकरे यांचा इशारा आणि घडामोडी घडल्या

| Updated on: Mar 28, 2023 | 11:31 PM

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील टीकेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमधले संबंध ताणले गेले. याचा महाविकास आघाडीवरही परिणाम होतो की काय? असं चित्र निर्माण झालं होतं. पण दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मध्यस्थी केलीय.

शरद पवार यांनी मार्ग काढला, राहुल गांधी यांचं वादग्रस्त विधान, उद्धव ठाकरे यांचा इशारा आणि घडामोडी घडल्या
Follow us on

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांवरुन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) काँग्रेस नेते राहुल गांधींना (Rahul Gandhi) दिलेल्या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) मध्यस्थी केलीय. त्यानंतर खासदार संजय राऊतांनीही (Sanjay Raut) राहुल गांधींशी फोनवरुन चर्चा केली. पण महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) ठिणगी पडते की काय? असं चित्र निर्माण झालं असताना, मल्लिकार्जुन खर्गेंच्या घरी झालेल्या बैठकीत शरद पवार नेमकं काय म्हणाले ते जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे.

सावरकरांना माफीवीर म्हणणं योग्य नाही. सावरकर आणि संघाचा काहीही संबंध नाही. सावरकरांचा महाराष्ट्रात आदर केला जातो. त्यामुळं टीका केल्यास महाविकास आघाडीवर परिणाम होईल. विरोधी पक्षाची लढाई ही भाजप आणि मोदींशी आहे, असं शरद पवार बैठकीत म्हणाल्याची माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे शरद पवारांनी मत मांडल्यानंतर राहुल गांधींनीही शरद पवारांच्या मताचा आदर असल्याची प्रतिक्रिया दिल्याचं सूत्रांकडून समजतंय. तर सावरकरांचा मुद्दा टाळावा, पक्षाचं नुकसान होईल असं काँग्रेसच्या खासदारांनी सोनिया गांधींना सांगितल्याचं कळतंय.

संजय राऊतांची भाजपवर टीका

सोबत लढायचं असेल तर सावरकरांवरील टीका मान्य नाही, असं कडक शब्दात उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना ठणकावलं. त्यानंतर महाविकास आघाडीतून ठाकरे गट बाहेर पडणार का? अशा चर्चाही सुरु झाल्या. अखेर दिल्लीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न शरद पवार आणि संजय राऊतांनी केलाय. राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केल्याचं सांगत सत्ताधारी, सावरकर गौरव यात्रा काढणार आहेत. पण भाजपचं ढोंग असल्याची टीका राऊतांनी केलीय.

सत्तांतरानंतरही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी महाविकास आघाडी महाराष्ट्रात भक्कम आहे. पण राहुल गांधींच्या सावरकरांवरील टीकेमुळं भाजप आणि शिंदेंची शिवसेना ठाकरेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्हं निर्माण करतेय. दुसरीकडे हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेंनी सावरकरांच्या विषयावरुन काँग्रेसला इशारा देताना, वादग्रस्त वक्तव्य केलंय.

पक्षांच्या महाविकास आघाडीचा सामना भाजपशीच आहे. आता यात राष्ट्रवादी सावरकरांवर टीका करत नाही. पण राहुल गांधी टीका करत असल्यानं महाविकास आघाडीत फूट पडते की काय? असं चित्र निर्माण झालं होतं. मात्र तूर्तास धूसफूस शांत होत असल्याचं दिसतंय.