मुंबई : बिल्किस बानो (Bilkis Bano) यांच्यामुळे गोध्राकांड पुन्हा चर्चेत आले आहे. त्यातच आता शिवसेनेनेदेखील गुजरातमध्ये 2002 मध्ये झालेल्या गोध्रा दंगलीचा(Godhra riots) मुद्दा उकरुन काढला आहे. या दंगलीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार(NCP chief Sharad Pawar ) यांनी भाजप नेते अमित शहा( BJP leader Amit Shah) यांना वाचवल्याचा मोठा दावा शिवसेने केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वर्तमान पत्रातील साप्ताहिक कॉलम ‘रोखठोक’मध्ये शिवसेनेने गोध्रा दंगली बाबत विशेष लेख प्रसिद्ध केला आहे. यात हा दावा करण्यात आला आहे.
सामनातील रोखठोक हे सदर संजय राऊत लिहायचे. पण सध्या संजय राऊत हे पत्रा चाळ घोटाळाप्रकरणी आर्थर रोड जेलमध्ये आहेत. अद्यापही त्यांना जामीन मिळालेला नाही. संजय राऊत यांच्या गैरहजेरीतही ‘रोकठोक’सदर सुरुच आहे. ‘कडकनाथ मुंबईकर’या नावाने आता रोखठोक सदर प्रसिद्ध केले जात आहे.
या विशेष सदरात अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावर शिवसेनेने रोखठोक निशाणा साधला आहे. मुंबई दौऱ्यात शिवसेनेवर टीकेची झोड उठवत अमित शहा यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. रोखठोक मधून अमित शहांवर टीका
अमितभाई, तुम्ही बोलत रहा! मऱ्हाठा नक्की उठेल! महाराष्ट्राविषयीचा द्वेष
अमितभाई, तुम्ही बोलत रहा! मऱ्हाठा नक्की उठेल! या शीर्षका अंतर्गत शिवसेनेने मोठा गौप्यस्फोट केला आहे. अमित शहा हे वारंवार शिवसेनेच्या बाबतीत ही अशी भाषा वापरतात. हा त्यांच्या मनातील महाराष्ट्राविषयीचा द्वेष आहे. खरं तर त्यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसांविषयी सदैव कृतज्ञ राहायला हवे. केंद्रातले ‘यूपीए’ सरकार मोदी व अमित शहांच्या मागे हात धुऊन लागले असताना मोदी व पवारांतील सुसंवादामुळेच अमित शहा यांना गोध्रा हत्याकांडातील एका प्रकरणात जामिनावर मुक्त होण्यास मदत झाली. हा गौप्यस्फोट नसून सत्य आहे असे महाराष्ट्राविषयीचा द्वेष हा मुद्दा मांडताना म्हंटले आहे.
दरम्यान, शिवसेनेचा हा गौप्यस्फोट राष्ट्रवादीला पटलेला नाही. सामनामध्ये करण्यात आलेला दावा राष्ट्रवादीने फेटाळला आहे. या दाव्यात काहीही तथ्य नसून हा गौप्यस्फोट निराधार असल्याची प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.