बीड : माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे राजकारणात अत्यंत गंभीर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखलं जातं. त्यांचे कोणतेही विधान राजकारणात अत्यंत गंभीरपणे घेतलं जातं. मात्र, शरद पवार अनेकदा या राजकीय धावपळीत सुद्धा काहीसं हलकं-फुलकं बोलत असतात. उपस्थितांशी दिलखुलास आणि मनमोकळेपणाने संवाद साधत असतात. अशा प्रसंगाची राजकारणासह सर्वत्रच चर्चा होत राहते. असाच प्रसंग काल (15 एप्रिल) बीडमध्ये दिसून आला.
बीड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी शरद पवार बीडमध्ये आले होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे नेते अमरसिंह पंडित हे सुद्धा उपस्थित होते. सोनवणे यांना तिकीट मिळण्याआधी अमरसिंह पंडित यांच्याच नावाची चर्चा बीडच्या जागेसाठी होती. मात्र, ऐनवेळी बजरंग सोनवणे यांच्या नावाची घोषणा राष्ट्रवादीकडून करण्यात आली. त्यानंतर पंडित नाराज असल्याचे म्हटले गेले. मात्र, त्यांची समजूत काढण्यात राष्ट्रवादीला यश आले. उलट अमरसिंह पंडित जोरदारपणे बजरंग सोनवणेंचा प्रचार करत आहेत. याच दरम्यान एका सभेत शरद पवार आले होते.
या सभेत अमरसिंह पंडित यांनी शरद पवारांबद्दल बोलताना म्हटले की, या वयातही पवार इतके सक्रीय असतात. त्या अनुशंघाने शरद पवार यांनी काहीसा मिश्किल टोमणा अमरसिंह पंडित यांना लगावला. पवारांनी बजरंग सोनवणेंच्या प्रचारासाठीचं भाषण संपवलं. त्यानंतर पुन्हा ते माईकसमोर आले आणि म्हणाले, “दोन मिनिटं ऐका, मी आता अमरसिंहांबाबत बोललो. पण अमरसिंहाची एक गोष्ट मला अजिबात पटली नाही. मी त्यांना स्पष्ट सांगतो, वॉर्निंग देतो, पुन्हा असे बोलायचे नाही. ते म्हणाले, ‘या वयात सुद्धा’ म्हणजे मी काय म्हातारा झालो का?” शरद पवारांच्या या मिश्किल विधानानंतर सभेत एकच हशा पिकला.
हा प्रसंग घडण्याआधी शरद पवार हे अमरसिंह पंडित यांच्याबद्दल भरभरुन बोलले. तसेच, बीडचा उमेदवार म्हणून बजरंग सोनवणेंच्या नावाची शिफारसच अमरसिंह पंडित यांनी केल्याचे पवारांनी यावेळी सांगितले.
पवार म्हणाले, “बीडचा उमेदवार ठरवताना, अमरसिंह पंडित, प्रकाश साळुंखे या सगळ्या मंडळींना आम्ही विचारलं, काय करायचं? त्यांनी सांगितलं एक नाव आम्ही देतो. कोण देतो? तर म्हणाले, बजरंग सोनवणे. म्हटलं बजरंगला संधी देता? आमच्या मनात तुमचं (अमरसिंह पंडित) नाव होतं. ते म्हणाले, ठीक आहे, माझा विचार नंतर कधीतरी करा. पण आता आमच्या मनात बजरंग सोनावणे आहे. मला अमरसिंहांचा अभिमान वाटला, कारण त्यांचा उमेदवारीसाठी विचार करत असताना, त्यांच्या मनात बजरंग सोनवणेंचं नाव येतं आणि बीड जिल्ह्याचा प्रतिनिधी सामान्य शेतकऱ्याचा पोरगा दिल्लीत जावा असा विचार त्यांच्या मनात येतो.”
तसेच, “एक सांगतो, हा मोठेपणा तुम्ही (अमरसिंह पंडित) दाखवला, ही भूमिका तुम्ही घेतली, या तुमच्या विचारला, या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून सांगू इच्छितो, याची नोंद आम्ही घेऊ.” असे म्हणत शरद पवारांनी अमरसिंह पंडित यांना आश्वासनही दिले.
पाहा व्हिडीओ :