रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला राज्यात अपेक्षित यश मिळालं नाही. या अपयशातून सावरुन दोन्ही पक्ष आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. मात्र, इथेही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. कोकणात राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालं. कारण रत्नागिरीपर्यंत विस्तारलेल्या रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार आणि पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विजय मिळवला. मात्र, तरीही कोकणात राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत धुसफूस कायम आहे. कारण राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव हे नाराज असल्याची जोरदार चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.
आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस भवानात बैठकांचे सत्र सुरु केले आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय आणि जिल्हानिहाय शरद पवार आढावा घेत आहेत. यासाठी स्थानिक आमदार किंवा तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष तसेच महत्त्वाचे नेते उपस्थित राहत आहेत. विधानसभेसाठी राष्ट्रवादीने जोरदार तयारी सुरु केली असताना, कोकणात मात्र पक्षांतर्गत धुसफूस या बैठकांच्या निमित्ताने समोर आली आहे.
मुंबईत सुरु असणाऱ्या आढावा बैठकीला राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि दोनवेळा मंत्री राहिलेले भास्कर जाधव हे अनुपस्थित राहिले. प्रकृतीच्या कारणास्तव आपण बैठकीला हजर राहू शकलो नाही, असे जरी भास्कर जाधव यांनी सांगितले असले, तरी पडद्यामागील कारणं मात्र वेगळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
विशेष म्हणजे, भास्कर जाधव हे जरी प्रकृतीचं कारण देत अनुपस्थित राहिले असले, तरी गुहागरमधून तालुकाध्यक्षांसह राष्ट्रवादीचा इतरही कुणी पदाधिकारी मुंबईतील बैठकीला उपस्थित राहिला नाही. त्यामुळे भास्कर जाधव यांच्या नाराजीची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
भास्कर जाधव हे गुहागर विधानसभा मतदारंसघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यांनी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि भाजपचे नेते विनय नातू या दोन बड्या नेत्यांचा भास्कर जाधव यांन 2014 साली पराभव केला होता. मात्र, आता भास्कर जाधव पक्षातच नाराज असल्याची चर्चा आहे. स्वत: भास्कर जाधव हे आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त करत नाहीत आणि नाराजीचे कारणही कुणाला कळू देत नाहीत. मात्र, बैठकीला अनुपस्थित राहून, त्यांनी नाराजी आता समोर आली आहे.
दुसरीकडे, रत्नागिरी जिल्ह्यातच आणखी दोन ते तीन मतदारसंघात राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता आहे. कारण राजापूर मतदारसंघ सध्या काँग्रेसकडे आहे. मात्र, राजापूरची जागा राष्ट्रवादीला मिळावी, अशी मागणी राजापुरातून राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार अजित यशवंतराव यांनी केली आहे, तर रत्नागिरीतून सुदेश मयेकर यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी होत आहे. चिपळूणमध्येही काही वेगळी स्थिती नाही. तिथेही राष्ट्रवादीकडून जागेसाठी जोर होऊ लागला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी अंतर्गत धुसफूस दिसून येत आहे.
दरम्यान, भास्कर जाधव यांनी लोकसभा निवडणुकीवेळीही सुनील तटकरेंचं नाव रायगड मतदारसंघातून जाहीर झाल्यानंतर नाराजी दर्शवली होती. ते स्वत: रायगडमधून लढण्यास इच्छुक होते. मात्र, तटकरेंना तिकीट मिळालं आणि ते जिंकलेही. मात्र, भास्कर जाधव यांच्या गुहागर मतदारसंघातून सुनील तटकरे यांना लीड मिळाली नव्हती. तिथे शिवसेनेचे माजी मंत्री अनंत गीते यांना लीड मिळाली होती. त्यामुळे त्यावेळीही भास्कर जाधव यांची नाराजी लपून राहिली नव्हीत.
आता शिवसेनेतून नाराज होऊ राष्ट्रवादी आलेले आणि राष्ट्रवादीत येऊन प्रदेशाध्यक्ष पद, दोनवेळा मंत्रिपद भूषवलेले भास्कर जाधव आगामी काळात काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.