राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी काटेवाडीत मतदानाचा हक्क बजावला. अजितदादा मतदानाला आले, त्यावेळी त्यांची आई आणि पत्नीसोबत होती. मतदानानंतर टीव्ही 9 मराठीशी बोलताना अजित पवार यांनी ‘मेरी माँ मेरे साथ हैं!’ असं म्हटलं. त्यांच्या या डायलॉगची सर्वत्र चर्चा आहे. त्यांचा हा डायलॉग अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या ‘दीवार’ सिनेमाशी जोडला जात आहे. “कुठलीही निवडणूक मी महत्त्वाचीच मानतो. आमचं काम पाहून लोक आम्हाला पाठिंबा देतील असा विश्वास आहे” असं अजित पवार म्हणाले.
कुटुंबियांचा सपोर्ट नाही असं म्हटलं जात होतं, पण तुमची आई सोबत होती, त्यावर अजित पवार म्हणाले की, “पवार कुटुंबात सगळ्यात मोठी माझी आई आहे. माझी आई माझ्यासोबत आहे. बाकीच्यांचा काय विचार करताय ‘मेरी माँ मेरे साथ हैं!” तुमच्या भावाला तुम्हाला मिशी काढलेलं बघायचय, त्यावर अजित पवार म्हणाले की, “त्याने 10 वर्षापूर्वी मिशी काढली. तो आता माझी वाट बघतोय. अजून तो कसली कसली वाट बघतोय ते मी पाहणारच आहे” ‘
त्यावर अजित पवार सरळ म्हणाले निवडणूक आयोगाने चौकशी करावी
तुमच्यावर पैसे वाटल्याचा आरोप होतोय, त्यावर अजित पवारांनी उत्तर दिलं. “हा खोटा आरोप आहे. त्यांनी पैसे वाटले असतील. मी असले धंद केले नाहीत. निवडणूक आयोगाने चौकशी करावी” असं अजित पवार म्हणाले.
अजित पवारांचे सख्खे बंधु श्रीनिवास पवार काय म्हणाले?
‘मेरी माँ मेरे साथ हैं!” या अजित पवारांच्या डायलॉगवर त्यांचे सख्खे बंधु श्रीनिवास पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अजित पवार भाजपासोबत गेल्यापासून डायलॉगबाजी करत आहेत. अजित पवारांनी 86 वर्षाच्या आईला राजकारणात ओढायला नको होतं” असं श्रीनिवास पवार म्हणाले.