मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने एकदा नव्हे तर तीन वेळा भाजपसोबत जाण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला. अजित पवार यांनी आजच्या भाषणातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पोलखोल केली. तसेच शरद पवार यांच्या राजकारणातील धरसोडवृत्तीवरही भाष्य केलं. त्यामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र, असं असलं तरी शरद पवार हे माझं आजही दैवत आहे, असंही अजित पवार यांनी सांगितलं.
मधल्या निवडणुकीत राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यावेळी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद द्यायला नको होतं. ती संधी घ्यायला हवी होती. ती संधी मिळाली असती तर आजपर्यंत राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री राहिला असता, असं अजित पवार म्हणाले.
मंत्रिमंडळात नऊ जणांना संधी मिळाली आहे. अजून मंत्रीपद मिळणार आहे. अजूनही पालकमंत्रीपद मिळणार आहे. आपल्या विकास कामांना स्थगिती मिळाली होती, ती स्थगिती उठवायची आहे. विविध कारणाने आमदार आले नाही. मी कधीच भेदभाव केला नाही. उद्याही काम करण्यासाठी भेदभाव करणार नाही. भाजप आणि शिंदेगटांना सांगायचं की माझी प्रतिमा दबंग नेता, कडक नेता अशी झाली आहे. पण मी तसं होऊ देणार नाही. मी मुस्लिम, मागासवर्गीय आणि सर्वांना समान लेखणार आहे. विरोधात बसून विकासाला पोषक काम करता येत नाही, असं त्यांनी सांगितलं.
2017 काही वेगळं करण्याचा प्रयत्न झाला. त्याआधी 2014ला आम्ही सिल्व्हर ओकला होतो. त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आम्ही बाहेरून भाजपला पाठिंबा देऊ. आम्ही शांत बसलो. कारण नेत्याचा निर्णय होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. आम्हाला सांगितलं वानखेडेला शपथविधीच्या कार्यक्रमाला हजर राहा. आम्ही गेलो. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटले. त्यांनी आमची विचारपूस केली. भाजपसोबत जायचं नव्हतं तर आम्हाला तिकडे का पाठवलं? शपथविधीला का पाठवलं? 2017ला वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. सुनील तटकरे, मी, जयंत पाटील होते. सुधीर मुनगंटीवार, फडणवीस, विनोद तावडे, चंद्रकांत तावडे हे लोक होते. कोणती खाती, कोणती पालकमंत्रीपदं… मी कधीही खोटं बोलत नाही. खोटं बोललो तर पवारांची औलाद ठरणार नाही, असं ते म्हणाले.
त्यानंतर सुनील तटकरेंना दिल्लीला बोलावलं. भाजपचे वरिष्ठ नेते आणि तटकरे यांची बैठक झाली. भाजपने सांगितलं शिवसेना आमचा 25 वर्ष जुना मित्र पक्ष आहे. आम्ही शिवसेनेला सोडणार नाही. ते म्हणाले, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार राहील. आमचे वरिष्ठ नेते म्हणाले. ते चालणार नाही. शिवसेना जातीवादी आहे. त्यानंतर बोलणी फिस्कटली, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.
त्यानंतर 2019च्या निवडणुकीनंतर एका उद्योगपतीच्या घरी एक चर्चा झाली. पाच बैठका झाल्या. मला आणि देवेंद्रला सांगितलं कुठे बोलायचं नाही. नेत्यांनी सांगितलं म्हणून मी कुठे बोललो ना्ही. त्यानंतर अचानक बदल झाला. आम्हाला सांगितलं आपण शिवसेनेसोबत जायचं. 2017ला शिवसेना जातीयवादी होता. त्यानंतर अचानक काय झालं की शिवसेना जातीयवादी राहिला नाही. अन् भाजप जातीयवादी झाला. असं चालत नाही, असंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं. मला उपमुख्यमंत्री केलं. मी कधी हूँ की चूँ केलं नाही. कोरोना काळात काम केलं. त्यात हलगर्जीपणा केला नाही. त्यानंतर शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली. आम्ही आमच्या प्रमुखांना सांगितलं काही तरी वेगळं घडतंय. उद्धव ठाकरेंना सांगितलं काही तरी घडतंय. पण कुणी लक्ष दिलं नाही. एकनाथ शिंदे यांनी वेगळा निर्णय घेतला. ते गुवाहाटीला गेले. त्यावेळी आम्ही 51 आमदारांनी भाजपसोबत जाण्याचा प्रस्ताव ठेवला. पण वरिष्ठांनी निर्णय घेतला नाही, असं ते म्हणाले.