अजित पवार यांची वसंत मोरे यांना ऑफर, अन् पुण्यात मनसेच्या फुटीच्या चर्चेनं जोर धरला

| Updated on: Dec 05, 2022 | 6:36 PM

अजित पवार यांनी मनसेचे पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांनी राष्ट्रवादीत येण्याची ऑफर केली आणि पुणे मनसेत एकच खळबळ उडाली.

अजित पवार यांची वसंत मोरे यांना ऑफर, अन् पुण्यात मनसेच्या फुटीच्या चर्चेनं जोर धरला
Follow us on

प्रदीप कापसे, पुणे : अजित पवार आणि वसंत मोरे (Ajit Pawar and Vasant More) यांच्यातील एका भेटीनं सध्या पुण्यामध्ये मनसेच्या फुटीच्या चर्चेनं जोर धरलाय. एका लग्न सोहळ्यात अजित पवारांनी वसंत मोरेंना थेट राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली. आणि त्याला खुद्द वसंत मोरे यांनीच दुजोराही दिला आहे.

पुणे मनसेत (MNS) अनेक महिन्यांपासून गट-तट पडले आहेत. त्याची तक्रार अनेकदा वसंत मोरे यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या कानावर घातली. मात्र त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचं वसंत मोरे यांचं म्हणणं आहे. याआधी जेव्हा वसंत मोरे तक्रार घेऊन मुंबईत पोहोचले होते. तेव्हा राज ठाकरेंनी वसंत मोरेंना स्वतःच्या गाडीत बसवलं. तक्रार ऐकूनही घेतली. पण तरीही सारं-काही आलबेल नसल्याचं दिसतंय.

मनसेनं कालच पुण्यातले माथाडी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरेंची हकालपट्टी केली आणि त्यानंतर जवळपास 400 सदस्यांनी मनसेला रामराम ठोकलाय. पुणे मनसेमध्ये कधी-काळी ३ प्रमुख चेहरे होते. पहिले वसंत मोरे, दुसऱ्या रुपाली पाटील आणि तिसरे साईनाथ बाबर.

यापैकी रुपाली पाटील राष्ट्रवादीत गेल्या आहेत. वसंत मोरे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. आणि साईनाथ बाबर यांना मनसेनं शहराध्यक्ष केलंय. या घडीला पुण्यात मनसेचे दोनच नगरसेवक आहेत. एक वसंत मोरे आणि दुसरे साईनाथ बाबर.

पण सध्या मनसेच्या या दोन्ही प्रमुख नेत्यांमध्येच दोघांमध्येच वितुष्ट आलंय. वसंत मोरे हे पुण्यातला मनसेचा डॅशिंग चेहरा आहेत. सलग तिसऱ्यांदा नगरसेवक पदावर निवडून आणि पुणे महापालिकेत विरोधी पक्षनेते झालेले वसंत मोरे मनसेचे पहिलेच नेते आहेत. मात्र ४ महिन्यात वारंवार पुणे मनसेत उफाळणारी नाराजी मनसेसाठी डोकेदुखी ठरु शकते.

2019 मध्ये वसंत मोरेंनी मनसेकडून हडपसर विधानसभा निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादी आणि भाजपच्या शर्यतीत मोरेंनी चांगली मतंही घेतली. किंबहूना मोरेंनी मिळालेल्या मतामुळेच राष्ट्रवादीच्या उमेदवारानं भाजपच्या उमेदवाराला पाडल्याचंही बोललं गेलं.

हडपसरमध्ये भाजपच्या योगेश टिळेकरांना 89 हजार 506 मतं मिळाली. राष्ट्रवादीचे चेतन तुपे 92144 मतं घेत अवघ्या 2 हजारांच्या फरकानं जिंकले. आणि याच लढतीत मनसेच्या वसंत मोरेंनी 34 हजार 809 मतं घेतली होती. म्हणून वसंत मोरे जर राष्ट्रवादीत गेले, तर मनसेसाठी हा मोठा धक्का असेल. त्यामुळे मनसे पुन्हा एकदा वसंत मोरेंच्या मनधरणीत यशस्वी होईल की मग वारंवार नाराजी व्यक्त करुन मोरेंची अवस्था एकनाथ खडसेंसारखी होईल हे पाहणं महत्वाचं आहे.