संतोष जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, उस्मानाबाद: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. या सरकारमधील (government) आमदार आणि मंत्री बोलतात कसे? चुन चुन के, गिन गिनके मारू, असं हे लोक म्हणतात. असं बोलायला देशात काय मोगलाई आहे का? लोक डोक्यावर घेतात व पायाखाली घेतात. एकनाथ शिंदे (eknath shinde) सरकारमध्ये काही मंत्री, आमदारांना सत्तेची नशा व मस्ती आली आहे. अरे कारे सुरु आहे, यासाठी सत्ता घेतली आहे का?, असं सांगत अजित पवार सत्ताधाऱ्यांवर भडकले. राजकीय लाटा येतात आणि जातात असं सांगतानाच बेरोजगारीचा प्रश्न आहे. हे प्रश्न कोण सोडवतंय? असा सवालही अजित पवार यांनी केला.
अजित पवार उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. कोणीच कोणाचा कायम विरोधी नसतो. सत्तेच्या लाटा येतात आणि जातात. त्यामुळे मी कधीही भेदभाव करीत नाही. त्यामुळे अनेक वेळेस आमदार झालो, असं अजित पवार यांनी सांगितलं. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच आपला पक्ष संपला असं म्हटलं तर कसे होणार? अशा शब्दात त्यांनी प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील यांचे कान टोचलेय
कधीच कोणाचा पक्ष संपत नसतो. भाजपचे केवळ 2 खासदार होते. मात्र ते थांबले नाहीत, असं सांगत त्यांनी भाजपचं कौतुक केलं. कुठेच कुणाची मक्तेदारी नसते. आता तर कोणीही कोणाला फोडत आहे. सध्या राज्यात 50 खोके, एकदम ओक्के सुरू आहे, असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला.
बाळासाहेब ठाकरे यांणी शिवसेना वाढविली. पण त्यांच्या मुलाला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी काही लोक कोणत्याही थराला गेले. उलट आम्ही वेगळ्या विचाराचे असतानाही सरकार चालविले, असा चिमटाही त्यांनी शिंदे गटाला लगावला.
उद्याच्या काळात राज्याचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा याचा विचार करून आमदार निवडून द्या. बूथ कमिटी स्थापन करा. पक्ष वाढवण्यासाठी काम करा, असं आवाहन त्यांनी केलं.
एकनाथ शिंदे सरकारमध्ये काही मंत्री. आमदारांना सत्तेची नशा व मस्ती आली आहे. अरे कारे सुरु आहे, यासाठी सत्ता घेतली आहे का? बोलताना भान ठेवले पाहिजे. कोणाचा अनादर होईल असं करू नका. आपल्यावर संस्कार झाले आहेत, महाराष्ट्र संस्कृती अपमान होईल असे बोलू नका, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.