मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आमनेसामने आले आहेत. अजित पवारांनी तर पटोलेंना जाहीरपणे खडेबोल सुनावलं आहे. आता या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक का झाली? तर त्याचं कारण आहे स्थानिक पातळीवर भाजप (BJP) आणि राष्ट्रवादीची (NCP) झालेली युती. सध्या बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यात आणि गोंदियात भाजप-राष्ट्रवादीनं हातमिळवणी करुन काँग्रेसला वेगळं केलंय. यावरुन पटोलेंनी राष्ट्रवादीवर टीका केली. शेतकरी विरोधी धोरण राबवणाऱ्या भाजपसोबत राष्ट्रवादी युती करत असेल तर राष्ट्रवादीही शेतकरी विरोधी होईल असं पटोले म्हणाले आहेत.
नाना पटोले यांनी अशाप्रकारे जाहीरपणे बोलणं बंद करावं, अशा शब्दात अजित पवारांनी आपला राग व्यक्त केला आणि महाविकास आघाडीच्या बैठकीतही पटोलेंचा विषय मांडणार असल्याचं म्हटलंय. त्यानंतर पुन्हा पटोलेंनी अजित पवारांना माझं जयंत पाटलांशी बोलणं झालं असून त्यांच्याकडून माहिती घ्या, असा टोला लगावला.
विशेष म्हणजे गोंदियाच नाही तर कराडमध्येही राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आलीय. गोंदिया जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीची युती झालीय. इथं काँग्रेसचं पॅनल स्वबळावर लढणार आहे. कराडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपचे अतुल भोसले आणि राष्ट्रवादीचे माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी एकत्र येत शेतकरी विकास पॅनेलची घोषणा केलीय आणि काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांच्या पॅनलच्या विरोधात भाजप-राष्ट्रवादीची युती झालीय.
त्यामुळे राज्यात आणि केंद्रात जर भाजपशीच लढाई असेल. तर मग गावागावात स्थानिक पातळ्यांवर भाजपशी युती का ? असा सवाल पटोलेंचा राष्ट्रवादीला आहे आणि त्यावरुनच पटोले-अजित पवारांमध्ये जुंपलीय.
“महाविकास आघाडी जर टिकवायची असेल तर बैठकीत बोलले पाहिजे, मीडिया समोर बोलण्याची गरज नाही. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे वारंवार मविआत काय तरी अलबेल असल्यासारखं बोलत असतात. त्यांच्या अशा बोललण्याने आघाडीमध्ये अंतर पडू शकतं. यामुळे या गोष्टी बंद केल्या पाहिजे. ज्यावेळेस आमची महाविकास आघाडीची सभा होईल त्यावेळेस आपण याबाबत बोलणार”, अशा शब्दांत अजित पवार यांनी सुनावलं आहे.
अजित पवार संतापल्यानंतर आता महाविकास आघाडीचे इतर नेते तसेच काँग्रेसकडून काय भूमिका येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाविकास आघाडीच्या पहिल्या वज्रमूठ सभेत नाना पटोले गैरहजर होते. त्यामुळे आगामी काळात काय राजकीय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.