राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आज अचानक शरद पवार यांच्या भेटीसाठी सिलवर ओकवर पोहोचले. कालच छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर मोठा आरोप केला होता. आज अचानक भुजबळ पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. “मी आज शरद पवार साहेबांकडे सकाळीच गेलो होतो. त्यांची वेळ घेतली नव्हती. ते आजारी असल्याचं कळलं होतं. सव्वा दहा वाजता गेलो होतो. ते तब्येत बरी नसल्याने झोपले होते. त्यामुळे मी एक दीड तास थांबलो. ते उठले आणि मला बोलावलं. ते बिछान्यावरच झोपलेले होते. तब्येत बरी नव्हती. मी बाजूला खुर्ची ठेवून बोलत होतो. दीड तास चर्चा केली” असं छगन भुजबळ म्हणाले.
“मी कोणतंही राजकारण घेऊन आलेलो नाही. मंत्री आणि आमदार म्हणून आलो नाही. पक्षीय भूमिका नाही. राज्यात ओबीसींना आरक्षण देण्याचं काम तुम्ही राबवलं. आणि आता राज्यात काही जिल्ह्यात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक मराठा समाजाच्या हॉटेलात जात नाहीत. काही लोक ओबीसी, धनगर आणि वंजारी आणि माळी समाजाच्या दुकानात मराठा समाज जात नाही. अशी परिस्थिती झाली आहे. राज्यातील ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे, ही शांतता निर्माण झाली पाहिजे” असं मी त्यांना सांगितल्याच छगन भुजबळ म्हणाले.
‘सरकारचं काय होईल ते होईल’
“त्यांना आठवण करून दिली. बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देताना असाच मराठवाडा पेटला होता. तेव्हा मराठवाडा शांत करून तुम्ही निर्णय घेतला. सरकारचं काय होईल ते होईल आपण हे काम केलं पाहिजे. त्यानुसार तुम्ही बाबासाहेबांचं नाव जोडलं. आज अशी परिस्थिती आहे. तुम्ही आलाच नाही” असं छगन भुजबळ म्हणाले.
पवार काय म्हणाले?
“मुख्यमंत्री जरांगेंना भेटले काय चर्चा केली. काय आश्वासने दिली हे आम्हाला माहीत नाही” असं पवार म्हणाले. “तुम्ही हाके आणि वाघमारे यांचं उपोषण सोडवायला गेला तुम्ही त्यांना काय सांगितलं माहीत नाही, असं शरद पवार मला म्हणाले” असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.