रवी गोरे, जळगाव, दि.2 फेब्रुवारी 2024 | महाराष्ट्रातील राजकारणात एकनाथ खडसे यांचा चांगलाच दबदबा आहे. भाजपमध्ये असताना ते विरोध पक्षनेते होते. त्यावेळी सभागृहात त्यांनी सत्ताधाऱ्यांना अनेक वेळा अडचणीत आणले. भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते दाखल झाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची एकही संधी ते सोडत नाहीत. आता राज्यात तीन पक्षांचे महायुतीचे सरकार आहे. या सरकारवर त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. सरकारमधील आमदारांची बेरोजगारी कमी झाली मात्र राज्यात बेरोजगारांची संख्या वाढली, असा घाणाघाती हल्ला त्यांनी चढवला.
राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर आहे. चोरी, दरोडे आणि इतर गुन्हे वाढत चालले आहेत. काय चाललंय या सरकारमध्ये ? हे तीन रंगाचं हे सरकार आहे. या सरकारची परिस्थिती म्हणजे दोन बायका आणि फजिती ऐका…अशी आहे. एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावर टीका करण्यासाठी दोन बायका आणि फजिती ऐका, या मराठी चित्रपटाचा आधार घेतला.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या टीकेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनाही सोडले नाही. ते म्हणाले, कुणाकुणाचे काय भाग्य फुलते. रिक्षावाला मुख्यमंत्री होतो तर टपरीवाला मंत्री होतो. मुक्ताईनगरचे आमदार 50 कोटी घेऊन ओके होतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, मंत्री गुलाबराव पाटील, मुक्ताईनगर ते शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील या सर्वांना एकनाथ खडसे यांनी टीका केली आहे.
एकनाथ खडसे यांचा टीकेचा रोख नेहमी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन आणि मुक्ताईनगरमधील त्यांचे राजकीय विरोधक आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर असतो. परंतु गुरुवारी जळगावातील कार्यक्रमात तीन पक्षांच्या महायुती सरकारमधील सर्वच नेत्यांना त्यांनी घेरले.