सातारा : सातारा जिल्ह्यातील निरा-देवघर पाणी प्रश्नावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापू लागलं असताना, सातारा राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहामुळे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. रामराजे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे 5 आमदार कार्यरत असून फलटणचे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर विधानसभेचे सभापती पद भूषवत आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील आघाडीत बिघाडी झालेली पहायला मिळते आहे.
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी निरा-देवघर पाणी प्रश्नावर शासनाने काढलेला अध्यादेश उशिरा काढल्याचे सांगत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला होता. यावर रामराजेंनी प्रत्युत्तर देताना पिसाळलेल्या कुत्र्याची उपमा उदयनराजेंना दिली होती. याचबरोबर रामराजेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे उदयनराजेंना आवरा नाहीतर आम्हाला पक्षातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा करा, असं सूचक विधान केल होतं. मात्र यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी पक्षातून बाहेर पडण्याच खापर माझ्यावर फोडू नये असं विधान केल होतं.
यानंतर पक्ष श्रेष्ठींकडून दोघांना समजावण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. मात्र सध्या विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला जिल्ह्यात उधाण आलं आहे. याबाबत सातारा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनिल माने यांनी ही चर्चा चुकीची असल्याच सांगत ते कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे.
शिवसेनेने साताऱ्याला 1995 पासून दोन खासदार आणि 2 आमदार दिलेत. पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असून उद्धव ठाकरेंनी रामराजेंना पक्षात घेतलं तर आम्ही याचं स्वागत करु. रामराजेंच्या पक्षात येण्यानं पक्षाला जिल्ह्यात बळकटी येईल, अशी प्रतिक्रिया सातारा जिल्हा शिवसेना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी दिली.
राष्ट्रवादीतील नेते निरा-देवघरच्या पाण्यावरुन भांडत असून खासदार उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकरांचा वाद योग्य नसून याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला भविष्यात बसू शकतो. तसेच याचा फायदा भाजपा शिवसेना उठवताना पहायला मिळेल आणि राष्ट्रवादी चे आमदार किंवा खासदार भाजपात प्रवेश करताना पहायला मिळतील, असं मत जेष्ठ पत्रकार विजय मांडके यांनी व्यक्त केलं आहे.
रामराजे नाईक निंबाळकर यांचा शिवसेनेत प्रवेश झाला तर राष्ट्रवादी कांग्रेसला याचा खुप मोठाफटका बसू शकतो याचं कारण म्हणजे सातारा जिल्ह्याच्या राजकारणातील चाणक्य म्हणून रामराजे नाईक निंबाळकरांना ओळखलं जातं आणि याच मुळे तळागाळातील कार्यकर्त्यांच्या संपर्कातील राष्ट्रवादीचा मोहरा शिवसेनेत गेला, तर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात भुईसपाट होईल, असेच अंदाज लावले जात आहेत. यामुळे दोन्ही राजेंच भांडण जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला घेऊनच बुडेल अशी चर्चा सध्या सुरु आहे.