मुंबई : ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) 2019 च्या निवडणुकीवेळी म्हणाले अन् हा डायलॉग त्यांच्या नावासोबत कायमचा जोडला गेला. काहीवेळा हा डायलॉग त्यांच्या प्रगतीचं प्रतीक बनला तर कधी त्यांना याच डायलॉगवरून हिणवलं गेलं. पण त्यांचा हा डायलॉग सध्या खरा ठरताना दिसतोय. कारण राज्यात पुन्हा फडणवीस सरकार अस्तित्वात येईल अन् देवेंद्र पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी बसतील. त्यांच्या याच डायलॉगवर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांना विचारण्यात आलं तेव्हा ‘मी नंतर बोलेन…’, असं म्हणत कोटी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. याशिवाय विविध मुद्द्यांवर जयंत पाटलांनी आपलं मत व्यक्त केलंय. “विरोधी पक्षनेते याबाबत अजून तरी विचार झालेला नाही. लवकरच आम्ही एकत्र बसुन निर्णय घेऊ”, असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.
“आमदार मुंबईत आहेत ते शरद पवार यांना भेटायला येणार आहेत. विरोधी पक्षनेते याबाबत अजून तरी विचार झालेला नाही. लवकरच आम्ही एकत्र बसुन निर्णय घेऊ. मुख्यमंत्री राजीनामा देतील असा साधरण अंदाज होता. तसं काल घडलं. ज्यांना आमदार केलं त्यांनीच भुमिका घेतल्यामुळे हे सर्व न पटणारे आणि दुर्दैवी आहे”, असंही जयंत पाटील म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर जयंत पाटलांनी आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे राजीनामा देणारं आहेत, याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना माहिती नव्हतं. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातुन घोषणा केली त्यावेळी मला आणि शरद पवार यांना माहिती मिळाली. शरद पवार यांना याचं आश्चर्य वाटलं, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यापूर्वी शरद पवार यांना त्याची माहिती दिली नव्हती आणि ती का दिली नव्हती? असा प्रश्न विचारला जातोय.