सांगली: राज्य मंत्रिमंडळाचा (cabinet expansion) विस्तार कधी होणार? यावरून गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी सांगितलं. तर, काही बातम्या नसतील तर मंत्रिमंडळ विस्तार हीच बातमी मीडियासमोर असते, असं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी यावर भाष्य करणं टाळलं. सत्ताधाऱ्यांकडून मंत्रिमंडळ विस्ताराव भाष्य करणं टाळलं जात असलं तरी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मात्र आता त्यावर भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केलं आहे.
जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार केला तर अनेक आमदार सोडून जातील. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर आमदार उद्धव ठाकरेंकडे निघून जातील. त्यामुळे संख्याबळ कमी होईल अशी भीती सरकारला आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नाही, असा चिमटा जयंत पाटील यांनी काढला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच विस्तार करू असे म्हटले. पण मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली तरच ती खरी मानली जाते, असा टोलाही त्यांनी लगावला.
बच्चू कडू आणि रवी राणा या दोन आमदारांमधील संघर्षावरही त्यांनी भाष्य केलं. बच्चू कडू यांच्यावर आरोप झाले आहेत. त्यावर बच्चू कडू यांनी भूमिका घेतली आहे. त्याबाबत नवल वाटण्यासारखं नाही. आरोप होऊन सुद्धा बच्चू कडू अजून गप्प का? त्यावर भविष्यात ठामपणे भूमिका घेतली तर नवल वाटायला नको? असं ते म्हणाले.
मंत्री नेमायचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. बच्चू कडू यांनी मंत्रिपदापेक्षा त्यांच्यावर झालेल्या आरोपातून बाहेर पडणे महत्त्वाचे आहे, असंही त्यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे आणि भाजपला महाराष्ट्रात येणाऱ्या आगामी निवडणूकीत लोक निवडून देतील का याची शाश्वती वाटत नाही. त्यामुळं निवडणूका पुढे ढकलल्या जात आहेत, असं ते एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.
कटुता संपवा, कामाला लागा, असे म्हणत सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांना साद घालण्यात आली आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. ही फडणवीस यांना साद नसून आता त्यांनी राज्यकारभार चालू करावा असं सामनाच्या संपादकीयमधून म्हटलं आहे. चार महिन्यापेक्षा जास्त कालावधी सरकार स्थापन होऊन झाला आहे. तरी कारभार नीट सुरू नाही. म्हणूनच सामनातून ही साद घालण्यात आल्याचं ते म्हणाले.
येत्या 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीचं शिर्डीत शिबीर पार पडणार आहे. केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर, महागाई, माध्यमाची मुस्कटदाबी यासह देशातील अनेक विषयांवर प्रश्नांवर या शिबिरात मंथन होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
प्रकल्प महाराष्ट्रच्या बाहेर जात असताना बेरोजगाराच्यांमध्ये निराशा निर्माण झालीय. आम्ही जी पोलीस भरती जाहीर केली तीच भरती हे सरकार जाहीर करतेय. या सरकारडून नवीन काही काम होत नाही. उद्योग टिकवण्याची जबाबदारी जे सरकारमध्ये आहेत त्यांची आहे. पण या सत्तेतील लोकांकडून निराशा होत आहे, असंही ते म्हणाले.