मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil ST Driving Video) यांनी सांगलीत एसटी चालवली होती. त्यावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. भाजपने घेतलेल्या या मागणीवर जयंत पाटील यांनी टोला लगावला आहे. भाजपने (BJP vs NCP) चिडून माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दिले, असं ते म्हणालेत. विधानभवनात (Maharashtra Assembly Session) ते पत्रकारांशी बोलत होते. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी एसटी चालवण्याच्या प्रकारावर सविस्तर प्रतिक्रिया दिली. विरोधी पक्षांवर दबाब आणण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, असा आरोप त्यांनी केला. शिवाय मी एसटीचं सारथ्य केल्यामुळे मला खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या होत्या, असंही ते म्हणाले. पण यामुळे भाजपचे काही स्थानिक कार्यकर्ते चिडले असल्याचं म्हणत जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधलाय. सरकारला काय कारवाई करायची आहे, ती त्यांनी करावी, असं म्हणत जयंत पाटील यांनी सरकारला चॅलेंज केलंय.
जयंत पाटील यांनी स्वातंत्र्यदिनी एसटीचं सारथ्य केलं होतं. त्यावेळी त्यांच्याकडे एसटी चालवण्याचं लायसन्स आहे की नाही, यावरुही सवाल उपस्थित करण्यात आले होते. दरम्यान, लायसन्स माझ्याकडे आहे, असं त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय. ‘कायद्याने काय कारवाई करायची आहे, ती त्यांनी करवी. मी चुकलो असेन तर माझ्यावर कारवाई करावी’, असंही ते म्हणाले आहेत. एका लोकप्रतिनिधीने एसटीचं सारथ्य केल्यामुळे सर्वसामान्यांना आनंद झाला होता, असंही जयंत पाटील यांनी म्हटलंय.
ईडीमध्ये एखाद्यावर आरोप केला, तर त्यानेच चो सिद्ध करावा लागतो, आता माझ्यावर झालेला आरोपही ईडी सदृश्य आहे, असंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान, 50 खोक्के, सगळे ओक्के, अशा घोषणा राष्ट्रवादीकडून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देण्यात आल्या होत्या. आता सगळं ओक्के झालंय का, असा प्रश्नही जयंत पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर सरकारमधील आमदारच सांगत सगळं ओक्के आहे असं सांगत असून हे सगळे बंडखोर ओक्के झाल्यानंतरच गुवाहाटीवरुन परतलेत, असा टोला जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना लगावलाय. विशेष म्हणजे पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही राष्ट्रवादीसह काँग्रेस आमदारांनीही शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात घोषणा दिल्या. गद्दारांना भाजपची ताट वाटी, चलो गुवाहाटी, चलो गुवाहाटी अशा घोषणा देत राष्ट्रवादीच्या आमदारांनीही बंडखोरांना डिवचलं.