मुंबई: देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) हे मुख्यमंत्री होतील असं वाटत होतं. भाजपचा एक मुख्यमंत्री होणारा नेता… पक्षात ताकद वाढणारा नेता…पंतप्रधान पदाच्या शर्यतीमधील नेता होता… परंतु असाही योग येऊ शकतो त्या नेत्याला उपमुख्यमंत्री केले जाते. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. हे भाजपच्या (bjp) लक्षात कसं येत नाही?, असा खोचक टोला राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी लगावला. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जयंत पाटील यांनी सत्ताधारी मंत्र्यांना, आमदारांना तर कधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना चिमटे काढले तर कधी मिश्किल आणि खोचक टिप्पणी केल्याने सभागृहात एकच हशाच हशा पिकला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लूटली. त्या सुरतेला तुम्ही शरण व्हायला गेलात. तुमची सुरतेवर स्वारी झाली. परंतु त्याने महाराष्ट्राची बदनामीच झाली, अशा शब्दात पाटील यांनी शिंदे गटाला खडेबोल सुनावले
80 टक्के मार्क मिळालेल्यांनी 20 टक्के मार्क असलेल्या लोकांना पाठिंबा दिला याबद्दल आश्चर्य व्यक्त करतानाच चिमणआबा तुम्ही गुवाहाटीत पहिल्या लॉटमध्ये गेलात. ससा आणि कासवाची कथा तुम्हाला माहीत आहे. गुलाबराव माहीत आहे की नाही असा त्यांच्याकडे बघत सवाल केला. गुलाबराव पाटील गुवाहाटीत उशिरा आले आणि पहिले मंत्री झाले. चिमणआबा मात्र पाठीमागे राहिले व मंत्री झालेच नाहीत. यांच्यासाठी कोणते मेरीट लावले?, असा सवालही जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला.
गुलाबरावांना मंत्री केलं त्याला विरोध नाही. पण चिमणआबा काय झाले तुमचे? शिरसाटांना मंत्री का केले नाही? आता कसं अडजेस्ट करणार त्यांना.\ संघाचे काम नाना किती वर्ष केलं तुम्ही. नानांची निष्ठेची टोपी बाहेर ठेवली गेली आणि कॉंग्रेसकडून आलेल्या सत्तारांना मंत्री केले. नानांसारख्या ज्येष्ठ माणसाचा विचार का केला नाही? दादा भुसे चांगलं कृषी मंत्री म्हणून काम केलं असताना त्यांना कुठलं खातं दिले असे मिश्किल चिमटेही जयंत पाटील यांनी काढले. बच्चू कडू सध्या अडीच वर्षे सह्यांवर दिवस काढतील असं वाटतं. मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळणार पण कधी पाळणार. हल्ली तुम्हाला घेरलेले आहे. त्यामुळे त्यांना कॅबिनेट करा असा सल्लाही दिला.
हे सरकार अस्तित्वात येत असताना काय घडलं? सध्या सुप्रीम कोर्टात केस सुरू आहे. मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वासात घेऊन काम करा असे एकनाथ शिंदे यांना सांगतानाच सध्या तुम्ही त्यांना विश्वासात घेत नाही असं एकंदरीत दिसत आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घेतले ते त्यांना माहीत नसते, असा टोलाही त्यांनी लगावला.