ठाणे: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचा आज 10 स्मृती दिन आहे. या निमित्ताने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. एका फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी हा उजाळा दिला आहे. विलासराव देशमुख यांची भाषणाची स्टाईल, राहणीमान, मैत्री, कार्यकर्त्यांशी असलेला संवाद, दिलदारपणा, त्यांच्या कामाची पद्धत या सर्व गोष्टींना उजाळा देतानाच त्यांच्याबाबत घडलेले विलासरावांचे दोन किस्सेही आव्हाड यांनी शेअर केले आहेत. कोणतीही शिफारस न करता आपल्या बहिणीला विलासरावांनी कोट्यातून दिलेलं घर आणि राष्ट्रवादीत (ncp) असूनही आपल्याला जवळ बोलवून एका कमिटीवर ठाण्यातील कार्यकर्त्याचं नाव सूचवण्यास सांगणं… आदी किस्सेही आव्हाड यांनी या पोस्टमध्ये शेअर केले आहेत.
सरपंच म्हणून सुरू झालेला विलासरावांचा प्रवास,महाराष्ट्राचे एक कर्तबगार मुख्यमंत्री,कार्यक्षम केंद्रीय मंत्री असा विलक्षण होता.या राज्याचे ते अत्यंत लोकप्रिय नेते होते.लोकांचे अद्भुत प्रेम त्यांना मिळाले होते.
आज विलासराव देशमुख यांची पुण्यतिथी.
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन..! pic.twitter.com/gp6tJggRgq— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 14, 2022
आव्हाड यांनी या फेसबुक पोस्टमध्ये काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला एका कमिटीवर कसं घेण्यात आलं याचा किस्सा सांगितला. विलासराव काँग्रेसमध्ये होते आणि मी राष्ट्रवादीत होतो. ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळामध्ये स्विकृत सदस्याचे एक पद द्यायचे होते. पण, काँग्रेसमध्ये प्रचंड वाद चालू होते. त्यादरम्यान त्यांनी एकेदिवशी मला विधानसभा चालू असताना आपल्या बाकाजवळ बोलावून घेतले आणि सांगितले की, तू एक नाव मला ठाण्यातील काँग्रेसमधील कार्यकर्त्याचे सूचवं. मी म्हटल, साहेब ते काँग्रेसचे कार्यकर्ते. मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता. मी कसे काय नाव सुचवणार? त्याचवेळेच ते पटकन एक वाक्य म्हणाले की, तू मनातून पक्का काँग्रेसी विचारांचा आहेस याची मला खात्री आहे. त्यामुळे तू जे नाव देशील ते मला मान्य असेल. मला आजही त्यांची ही वाक्य आठवतायेत. मी दुसऱ्या दिवशी एका चिठ्ठीवर राजेश जाधव असे नाव लिहून दिले. त्यांनी ते नाव घेतले आणि त्यांचे भिसे नावाचे स्विय्य सहाय्यक होते त्यांच्या हातात दिले आणि सांगितले की, ह्या नावाची घोषणा करायला सांगा. 24 तासात घोषणा झाली व राजेश जाधव हे शिक्षण मंडळाचे सदस्य झाले, असं आव्हाड सांगतात.
विलासरावांना राजीनामा देण्यास सांगण्यात आलं. ही सगळी गडबड चालू असतानाच एकेदिवशी सकाळी साडेचार ते पावणेपाचच्या दरम्यान माझा मोबाईल वाजला. समोरून आवाज आला. जितेंद्र आव्हाड बोलताय का? तर मी हो म्हटलं. समोरून आवाज आला मी जऱ्हाड बोलतोय. (जऱ्हाड जे विलासराव देशमुख साहेबांचे स्विय्य सचिव होते) त्यांनी सांगितले साहेबांना तुमच्याशी बोलायचे आहे. मी आश्चर्य व्यक्त केले की, एवढ्या सकाळी विलासरावांचा फोन कशाला आला?
त्यांनी समोरून विचारले की, जितेंद्र तुझी ज्योती नावाची बहीण आहे ना? तर मी लागलीच म्हटलं हो साहेब. तर ते म्हणाले तिने 10 टक्के कोट्यातून घर मिळण्याची अॅप्लीकेशन केले होते का? मी म्हटलं हो साहेब. खूप वर्षांपूर्वी केले होते. तर ते म्हणाले की, तू कधी मला बोलला नाहीस. मी म्हटलं साहेब एवढ्या छोट्याश्या गोष्टीसाठी आपल्याशी कसं बोलाव हे मला जमलं नाही. ते समोरून म्हणाले की, माझ्या समोर आता दोन फ्लॅट आहेत. एक साडे आठशे स्क्वेअर फूटाचा आणि दुसरा साडे नऊशे स्क्वेअर फूटाचा आहे. मी साडे नऊशे स्क्वेअर फूटाचा फ्लॅट तुझ्या बहिणीच्या नावावर करतोय. आणि फोन डिस्कनेक्ट केला. नंतरचे पेपरवर्क कसे झाले ते मला काही आठवत नाही. पण, तो फ्लॅट आता माझ्या बहिणीच्या नावावर आला, अशी आठवणही त्यांनी सांगितली.
असे नेते आता दिसतील का? किती मोठे मन लागते याच्यासाठी. मी तसा काही विलासरावांच्या आतल्या गटातला, जवळचा वगैरे काही नव्हतो. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो ते काँग्रेसमध्ये होते. व तसा काही दुरान्वयेही त्यांचा आणि माझा कधी मैत्रीपूर्ण संवाद किंवा अतिशय चांगले संबंध असेही काही नव्हते. एक कार्यकर्ता व नेता म्हणून जे काही संबंध होते तितकेच. पण, अशाही परिस्थितीत नाव चाळत असताना माझ्या आडनावात साधर्म दिसल्यामुळे फोन केला आणि ज्योती ही तुझी बहीण आहे का…आणि त्यानंतर सांगायचं की मी हा फ्लॅट तीच्या नावावर करतोय. याला मोठं मन लागतं, असंही आव्हाड म्हणाले.
त्यांची भाषणाची स्टाईल, त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांची शब्दफेक कपाळावरचे केस, भाषण करत असतानाचे हातवारे, त्यांची आणि गोपिनाथ मुंडेंची असलेली मैत्री, त्यांची आणि सुशिलकुमार शिंदेंची म्हणजे दो हंसो का जोडा म्हणून गाजलेली मैत्री, त्यांचा उल्हास दादा पवार किंवा सुधाकर गणगणे यांच्याशी मैत्रीचे संबंध हा महाराष्ट्रात नेहमीच चर्चेचा विषय असायचा. विधानपरिषदेमध्ये, विधानसभेमध्ये विरोधी बाकांवरती असलेल्यांकडून जेव्हा टीका-टिप्पणी होत असायची त्याला ज्या चपखलपणाने विलासराव उत्तर देत असत ते त्यांच्यातली राजकीय कलाकारी दर्शवत असत. कधीही न चिडता, आक्रमक न होता क्रिकेटमध्ये फक्त बॅट तिरकस करुन चौकार मारायचा… तशीच त्यांची शब्दफेक असायची. विरोधकाला तर निरुत्तर करायचे पण त्यांच्या चेहऱ्यावरती नेहमी हसरे भाव असायचे. वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या व्यासपीठावरून केलेली भाषणे महाराष्ट्राच्या कायम स्मरणात राहतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.