मुंबई: भाजप नेत्यांकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकारची बेईमानी करून आलेलं सरकार, अशी संभावना केली जात आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पलटवार केला आहे. भाजपने गेल्यावर्षी बेईमानी करून आणलेल्या सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे, अशी खोचक टीका नवाब मलिक यांनी केली आहे. (ncp leader nawab malik slams bjp)
‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना नवाब मलिक यांनी ही टीका केली. गेल्यावर्षी बेईमानीने तयार झालेले काही दिवसाचे सरकार राज्यात आले होते. त्याला एक वर्ष झालं आहे. भाजपने ही बेमाईनी केली होती, असं सांगतानाच आता काहीही केलं तरी सरकारला अडचण येणार नाही, असं मलिक यांनी सांगितलं.
वीजबिल माफीच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपने वीजबिल थकबाकी वसूल केली नाही. त्याचा परिणाम आज पाह्यला मिळत आहे. ग्राहकांना दिलासा द्यावा ही सरकारची इच्छा आहे. पण भाजपने एमएसईबीची अवस्था अत्यंत वाईट करून ठेवली आहे, अशी टीका मलिक यांनी केली.
यावेळी कोरोनावरही त्यांनी भाष्य केलं. कोरोनाच्या काळात जेवढी व्यवस्था राज्यात झाली. तेवढी व्यवस्था देशात कुठेच झाली नाही. महाराष्ट्र सरकारने कोरोना परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आहे, असंही त्यांनी नमूद केलं आहे.
मलिक यांनी यावेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरही भाष्य केलं. कुणाचा झेंडा काय आहे. त्याचा रंग काय आहे. त्यावर राजकारण चालत नाही. मुंबईत भाजपची ताकद नाही. मागच्यावेळी त्यांची हवा होती. त्या हवेत त्यांचे नगरसेवक निवडून आले. कोणतंही राजकारण दीर्घकाळ ‘हवे’वर चालत नाही. मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता येईल, असं मला वाटत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. (ncp leader nawab malik slams bjp)
कोरोनाच्या आधी फेब्रुवारीत चुनाभट्टीमध्ये आमचं शिबीर झालं होतं. या शिबिराला आठ हजार कार्यकर्ते उपस्थित होते. आम्ही पालिका निवडणुकीच्या कामाला सुरुवातही केली होती. पण कोरोनामुळे ते थांबलं. पण आता आम्ही निवडणुकीच्या कामाला लागलो आहोत. त्यासाठी संघटन बांधणी सुरू आहे. प्रत्येक वॉर्डात आमची बांधणी सुरू आहे, असं ते म्हणाले. सत्तेत असलेल्या सर्वांनी एकत्र येऊन निवडणुका लढवाव्यात अशी आमची इच्छा आहे. पण आज त्यावर भाष्य करता येणार नाही. निवडणुकीला वेळ आहे, असंही ते म्हणाले.
VIDEO | MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 10 AM | 23 November 2020 https://t.co/1Fg4iTIeFf @CMOMaharashtra #fastnews
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2020
संबंधित बातम्या:
‘वर्षपूर्ती जबाबदारीची, नांदी शाश्वत विकासाची’, महापौर मोहोळांचं एका वर्षाचं रिपोर्टकार्ड
(ncp leader nawab malik slams bjp)