महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होण्यास अवघे काही तास शिल्लक असताना आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या प्रमुख नेत्यांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी ‘लोकसत्ता’ वृत्तपत्राला मुलाखत दिलीय. या मुलाखतीत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल मोठा दावा केला. विशेष म्हणजे शरद पवारांचा संबंधित दावा खरा असल्याची कबुली खुद्द प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करत शरद पवारांच्या वक्तव्यावर खुलासा केला आहे. याचा अर्थ प्रफुल्ल पटेल यांना 19 वर्षांपासून भाजपसोबत जाण्याची इच्छा होती हे आता स्पष्ट झालं आहे.
“प्रफुल्ल पटेल 2004 पासूनच भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते. काँग्रेसबरोबर जाण्यास प्रफुल्ल पटेल यांनी विरोध केला होता. तरीदेखील युपीए सरकारमध्ये आम्ही पटेल यांना केंद्रीय मंत्रीपद दिलं. 2004च्या निवडणुकीच्या आधीपासून प्रफुल्लभाई सारखं सांगायचे की, या निवडणुकीत आपले पक्ष टिकणार नाहीत. वाजपेयींना पर्याय नाही. आपण सगळे भाजपमध्ये जाऊ, तासंतास त्यांनी आग्रह केला होता. शेवटी मी नाही म्हणून सांगितलं. तुम्ही जा म्हणून सांगितलं. शेवटी अक्षरश: त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं”, असा मोठा दावा शरद पवार यांनी केला. त्यावर प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं.
“होय, मी 2004 सालापासून भाजपाशी युती व्हावी असा आग्रह पवार साहेबांकडे धरला होता. तरी पण त्यांचा मान, सन्मान आणि त्यांच्याविषयीचा आदर असल्याने मी त्यांच्यासोबत राहिलो. त्यांनी केंद्रीय मंत्रीपदाची संधी दिल्याबद्दल मी सदैव त्यांचा आभारी राहीन. संधी मिळाल्यावर देशासाठी आणि जनतेसाठी चांगले काम करून पवार साहेब आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा सन्मान वाढविण्याच्या दृष्टीने मी सतत प्रयत्न केले”, असा खुलासा प्रफुल्ल पटेल यांनी केला.
होय, मी 2004 सालापासून भाजपाशी युती व्हावी असा आग्रह पवार साहेबांकडे धरला होता. तरी पण त्यांचा मान, सन्मान व त्यांच्याविषयीचा आदर असल्याने मी त्यांच्यासोबत राहिलो. त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची संधी दिल्याबद्दल मी सदैव त्यांचा आभारी राहीन. संधी मिळाल्यावर देशासाठी व जनतेसाठी…
— Praful Patel (@praful_patel) May 19, 2024
“हे देखील खरे आहे की, 1999 मध्ये कॉंग्रेसमध्ये सतत अपमान होत असल्यामुळे कॉंग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना पवार साहेबांना करावी लागली. तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत राहिलो. आणि हे ही तितकेच खरे आहे की, 2004 मध्ये कॉंग्रेसने आमच्या पक्षाचे जास्त आमदार निवडून आल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद नाकारले. साहेब, तुमच्याबद्दलचा आदर कायम आहे”, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत.