मुंबई : राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील गरवारे क्लब हाऊसमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सुभाष देशमुख यांच्यासह मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपप्रवेशामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीला सोलापूर जिल्ह्यात आणि विशेषत: माढा लोकसभा मतदारसंघात येत्या निवडणुकीत मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे.
माढात भाजपचाच खासदार होणार. आपलं सरकार येणार आहे आणि रणजितसिंह यांच्या येण्याने माढाचा खासदार भाजपाचा होणार. विजयसिंह मोहिते पाटील हे आमच्याबरोबर आहेत. मोहिते पाटील कुटुंबाचा मान कमी होऊ देणार नाही, असं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
जिल्ह्यातील पाण्याचा, सिंचनाचा प्रश्न आहेत ते मला सांगितले. प्रत्येक योजनेला केवळ मंजुरी दिली नाही, तर निधी दिला. महाराष्ट्राचं राजकारण मोहिते पाटील घराण्याशिवाय होऊ शकत नाही. मोहिते पाटील कुटुंबाची तिसरी पिढी आमच्याबरोबर आली. ते भाजप सोबत येत आहेत तो आनंदाचा क्षण आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
महाराष्ट्राच्या इतिहासातील आजचा महत्त्वाचा दिवस आहे. मोहिते पाटलांची तिसरी पिढी राजकारणात आहे, ते आज भाजपात आले, मला आनंद आहे. त्यांचं घराणं राजकीय सामाजिक क्षेत्रात अग्रस्थानी आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
LIVE UPDATE :
निवडणुकीच्या तोंडावर दोन धक्के
गेल्याच आठवड्यात काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहित पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला जोरदार धक्के बसले आहेत.
…म्हणून मोहिते पाटील गट नाराज
माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर, राष्ट्रवादीकडून माजी आयएएस अधिकारी प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे मोहिते पाटील गट नाराज होता. अखेर मोहिते पाटील गटाने पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.
माढ्यात काय परिणाम होईल?
फक्त माढाच नव्हे, तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात भाजपला मोहिते पाटलांचा फायदा होणार आहे. अनेक वर्ष मोहिते पाटलांनी जिल्ह्यावर वर्चस्व गाजवलं आहे. विजय सिंह मोहिते पाटील हे राज्याचे उपमुख्यमंत्रीही होते. त्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग सोलापूर जिल्ह्यात आहे.
विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी ज्या ठिकाणी भाजपात प्रवेश केला होता, त्याच ठिकाणी रणजित सिंह मोहिते पाटीलही भाजपात प्रवेश करणार आहेत. पुन्हा एकदा राज्यात वडील एका पक्षात आणि मुलगा दुसऱ्या पक्षात अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
कोण आहेत रणजितसिंह मोहिते पाटील?
रणजितसिंह मोहिते पाटील हे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र आहेत. राष्ट्रवादीकडून रणजितसिंह हे राज्यसभेवर खासदार होते. 2009 ते 2012 या कालावधीत रणजितसिंह राज्यसभेत कार्यरत होते. त्यापूर्वी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ते पहिले अध्यक्ष होते. तसेच, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. सोलापूर विभागाचं महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत रणजतिसिंहांनी प्रतिनिधित्त्वही केले आहे.