मुंबई: येत्या 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होत (President Election) आहे. त्यासाठी विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी येत्या 15 जून रोजी विरोधी पक्ष नेत्यांची बैठक बोलावली आहे. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही या बैठकीचं आमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. एकीकडे विरोधकांची राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू असतानाच दुसरीकडे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार झाल्यास आमचा त्यांना पाठिंबाच राहील असं म्हटलं आहे. तर, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पवार राष्ट्रपती होत असतील तर ती आनंदाचीच गोष्ट असेल, असं म्हटलं आहे. त्यामुळे पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्राची व्यक्ती देशाची राष्ट्रपती होत असेल तर याचा मला आनंदच होईल.#Maharashtra pic.twitter.com/IlLgZMliIe
— Nana Patole (@NANA_PATOLE) June 12, 2022
पालकमंत्री छगन भुजबळ येवला येथे सहकारी सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांच्या सत्काराच्या कार्यक्रमात आले होते. यावेळी पत्रकारांनी शरद पवार यांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून नाव चर्चेत असल्याचं सांगितलं. त्यावर, शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार केले जात असल्याबाबत पवार साहेबांनी होकार किंवा नकार दिल्याचं मला काही माहीत नाही. पण महाराष्ट्रातून शरद पवार हे एवढ्या मोठ्या पदावर गेल्यास महाराष्ट्रासाठी ही गोष्ट नक्कीच आनंदाची व अभिमानाची असेल, असं भुजबळ म्हणाले.
ममता बॅनर्जी यांनी जेवढेही विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री आहेत, तसेच विरोधी पार्टीचे अध्यक्ष आहेत, त्या सर्वांना आमंत्रित केलं आहे. या सर्वांसोबत बैठक होणार आहे. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी ही बैठक होत आहे. त्यात काही निर्णय होण्याची शक्यता आहे, असंही त्यांनी सांगितलं.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही ट्विट करून पवारांच्या नावाला पाठिंबा दर्शविला आहे. राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांचे नाव पुढे येत असेल तर काँग्रेसचा त्याला पाठिंबा असेल. महाराष्ट्रातील व्यक्ती देशाचे नेतृत्व करणार असेल तर याचा मला आनंदच होईल, असं ट्विट नाना पटोले यांनी केलं आहे.
राष्ट्रीय स्तरावरील निर्णयाबाबत काँग्रेसचे राज्यातील नेते कधीच भाष्य करत नाहीत. अशावेळी राष्ट्रपतीपदाबाबतच्या मोठ्या निर्णयाबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करून भाष्य केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पटोले यांच्या ट्विटचे अनेक अर्थ काढले जात आहेत. पवारांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून पुढे करायचं असं काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवर ठरत असल्याचे संकेतही यातून मिळत आहेत. तसेच राष्ट्रवादीकडूनही पवारांच्या या उमेदवारीला संमती दिली असेल त्यामुळेच पटोले यांनी ट्विट केलं असावं, असाही अंदाज वर्तवला जात आहे.
शरद पवार हे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून पुढे आल्यास त्यांना ममता बॅनर्जी, एमके स्टॅलिन, अखिलेश यादव, मायावती, चंद्राबाबू नायडूंपासून ते शिवसेनेपर्यंत सर्वच जण पाठिंबा देतील असं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे भाजपचे मित्रं पक्षही पवारांना पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून शरद पवार यांचे नाव पुढे आले तर त्यांच्या नावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही पाठिंबा दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोदी हे पवारांना गुरु मानतात. ते पवारांकडून वारंवार सल्ले घेत असतात. शिवाय त्यांचे पवारांशी चांगले सूर जुळतात. त्यामुळे मोदी पवारांना पाठिंबा देऊ शकतात, असं सूत्रांनी सांगितलं. मोदी सरकारमध्ये आले तेव्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी हे राष्ट्रपती होते. त्यावेळी मोदी यांना मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाचा प्रचंड फायदा झाला. आता पवार राष्ट्रपती झाल्यास मोदींना पवारांच्या अनुभवाचा अधिक फायदा होण्याची शक्यता आहे.