मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थमंत्री असल्याने त्यांच्या पक्षातील आमदारांची कामे पटापट होतात, पण शिवसेनेच्या आमदारांच्या कामांना हवी तशी गती मिळताना दिसत नाही, अशी तक्रार शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. शिवसेना आमदारांच्या या तक्रारीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे (NCP Leader Shashikant Shinde) यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली.
“तीन पक्षांचे सरकार म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या अपेक्षा निश्चितपणे वाढलेल्या असणार. राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती बघता सर्वांचेच कामं पूर्ण होतील, असं वाटत नाही”, असं शशिकांत शिंदे (NCP Leader Shashikant Shinde) म्हणाले.
“अजित पवार हे असं नेतृत्व आहे जे विरोधी पक्षातील आमदार आले तरी त्यांचेही कामं करतात. तसं भाजप सरकारच्या काळात होत नव्हतं. महाविकास आघाडीत शिवसेना-राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचे आमदार असोत, कोणत्याही आमदाराचं काम अजित दादांकडे आलं असेल तर ते निश्चितच होतं. अजित पवार यांनी आऊट ऑफ वे जाऊनदेखील कामे केलेली आहेत”, असा दावा शशिकांत शिंदे यांनी केला.
हेही वाचा : शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे जलद, सेना आमदारांचा मुख्यमंत्र्यांकडे नाराजीचा सूर
“विरोधी पक्षाच्या आमदारांचीदेखील कामे करणारा नेता म्हणून अजित पवारांची ओळख आहे. एखाद-दुसऱ्या आमदाराचं काम झालं नसेल तर त्याने तक्रार केली असेल. पण महाविकास आघाडीमध्ये अशी कोणतीही कुरबुर आहे, असं मला वाटत नाही”, अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदे यांनी दिली.
दरम्यान, शशिकांत शिंदे यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली. “एखाद्या विषयाबाबत किती राजकारण करावं याचीसुद्धा परिसीमा असते. तुमच्याकडे काही पुरावे असतील तर राज्यपाल किंवा केंद्राकडे ते द्यावे. केंद्रात तुमचे सरकार आहे. याप्रकरणी सीबीआय चौकशी करत आहे. राज्य सरकार स्वतःच्या पोलीस खात्यामार्फत चौकशी करत आहे. सुशांतच्या आत्महत्याबाबत वेगवेगळ्या प्रकारचे बातम्या येत आहेत. त्यादृष्टीनेही तपास सुरु आहे”, असं शशिकांत शिंदे म्हणाले.
“महाराष्ट्र पोलीस यात शंभर टक्के यशस्वी होतील. कोणत्या तरी विषयाचा राजकारणाशी निगडित असलेला फायदा लक्षात घेऊन पक्षांच्या प्रमुखांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणं हे गलिच्छ राजकारणाचा भाग आहे. भाजप हे इतक्या खालच्या थराला जाऊन राजकारण करत असेल तर ते योग्य नाही”, असा घणाघात शशिकांत शिंदे यांनी केला.
हेही वाचा : उद्धव ठाकरेंची शिवसेना आमदारांसोबत तब्बल 4 तास बैठक, रवींद्र वायकर यांची खास पदी नियुक्ती