मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्या सामनातील रोखठोक सदरात मोठा गौप्यस्फोट केला आहे. राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात नुकतीच झालेल्या बैठकीतील चर्चेविषयी माहिती दिलीय. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून कुटुंबावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण आम्ही राष्ट्रवादी पक्ष म्हणून भाजपसोबत जाणार नाहीत, असं शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितल्याच राऊतांनी आपल्या लेखात म्हटलं आहे. तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्याचा उल्लेख करत संजय राऊतांनी आपल्या लेखात अजित पवार यांच्याबद्दल प्रश्न उपस्थित केले.
विशेष म्हणजे अजित पवार यांच्याबद्दल सध्या विविध चर्चा रंगत आहे. अजित पवार केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावामुळे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या दरम्यान आता राऊतांच्या लेखातून शरद पवार यांची भूमिका समोर आली आहे. त्यामुळे अजित पवार आजच्या नागपूरच्या वज्रमूठ सभेला येणार नाहीत, अशी चर्चा होती. पण अजित पवार आज सभेला हजर आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंचावर अजित पवार यांच्यासमोर शायरीतून मोठं वक्तव्य केलं आहे.
“उद्धवजी मला एक आपल्याला एक सांगायचं आहे, कुछ तो मजबुरीयाँ रही होंगी, युहीं कोई बेवफा नहीं होता. काहीतरी अडचण असेल. कुठेतरी नस दाबली असेल, काहीतरी मजबुरी असेल, काहीतरी प्रोब्लेम असेल, अब समज लो, अब क्या करोंगे? पण महाराष्ट्रातील जनता या महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. मला खात्री आहे, उद्धवजी तुम्हाला कुणीही सोडून गेलं असलं तरी महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिकांना जे स्थान मातोश्रीला पूर्वी होतं ते स्थान आजही राहिलेलं आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.
“महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार भविष्यात काय करतील? 15 आमदारांसह ते भाजपात सामील होतील असे अयोध्येत गेलेले शिंदे व भाजपचे आमदार छातीठोकपणे सांगत होते. या सगळ्यांवर परखड खुलासा अजित पवार यांनीच करायला हवा. ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा ससेमिरा अजित पवार, त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे लागलाच आहे. त्यांच्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यांवर ईडीच्या धाडी पडल्या व कारखाना जप्त केला, पण आता यासंबंधात ईडीने जे आरोपपत्र दाखल केले त्यात पवार किंवा त्यांच्या कुटुंबीयांचे नाव नाही. मग जरंडेश्वर खरेदीच्या व्यवहारातील मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांचे काय झाले? की ते सर्व आरोप आणि धाडी राजकीय दबावासाठीच होत्या?”, असे प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केले आहेत.
“शिवसेनेचे 40 आमदार फोडून भाजपने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. हे अनैतिक आहे. त्यातले 16 जण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने अपात्र ठरतील म्हणून सत्ता वाचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तेवढेच आमदार ईडी, सीबीआयच्या मदतीने फोडायचे असे कारस्थान चालले आहे. ते 16 कोण? ज्यांच्यावर या ना त्या कारणाने खटले आहेत त्यांना धमकवायचे. हसन मुश्रीफ व त्यांच्या कुटुंबावर भाजपने हल्ले सुरू केले. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या व्यवहाराचे हे प्रकरण. मुश्रीफ यांनी जेरीस येऊन भाजपात जावे असा एकंदरीत खटाटोप आहे. मुश्रीफ हे शरद पवार यांचे विश्वासू, पण तुरुंगात कोणालाच जायचे नाही. एकनाथ शिंदे यांनाही तुरुंगात जायचे नव्हते. म्हणून त्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला. ते सरळ बेइमानांचे सरदार झाले”, असा घणाघात संजय राऊतांनी केला.
“मंगळवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शरद पवारांना भेटलो. ते म्हणाले, कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही, पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण ‘पक्ष’ म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही. महाराष्ट्रातील लोकांत सध्याच्या सरकारबद्दल कमालीचा संताप आहे. जे आता भाजपबरोबर जातील ते राजकीय आत्महत्या करतील असे पवार-ठाकरे यांचे मत पडले”, असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला.