मुंबई : “भाजपचे नेते लोकांची दिशाभूल करुन पूरग्रस्तांसाठी तात्काळ केंद्राने मदत दिली असल्याचा संभ्रम निर्माण करत आहेत. त्यामुळे लोकांनी कृपया यावर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राज्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केले. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी मंगळवारी (27 जुलै) लोकसभेत महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 701 कोटींची मदत जाहीर केल्याचा दावा केला. मात्र, ही मदत 2020 मध्ये झालेल्या नैसर्गिक अतिवृष्टीबाबत आहे, असंही महेश तपासे यांनी स्पष्ट केलं.
महेश तपासे म्हणाले, “महाराष्ट्र सरकारने 2020 मधील नैसर्गिक आपत्तीच्यावेळी केंद्राकडे 3 हजार 721 कोटी रुपयांची मदत मागितली. त्यापैकी केंद्र सरकारने केवळ 701 कोटी मदत दिली. ही विद्यमान पूरपरिस्थितीची मदत नाही. केंद्रसरकारकडे ज्यावेळी 3 हजार 721 कोटींची मागणी केली त्याचवेळी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील ग्रामीण भागातील पूरग्रस्तांसाठी 4 हजार 375 कोटींची मदत दिली.”
केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी मंगळवारी पावसाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ७०१ कोटींची मदत जाहीर केली. मात्र ही मदत २०२० साली झालेल्या अतिवृष्टीसाठीची आहे – @maheshtapase@nstomar #LokSabha pic.twitter.com/h4qYb4HrOp
— NCP (@NCPspeaks) July 29, 2021
“भाजपचे नेते लोकांची दिशाभूल करुन पूरग्रस्तांसाठी तात्काळ केंद्राने मदत दिली असल्याचा संभ्रम निर्माण करत आहेत,” असा आरोप महेश तपासे यांनी केला आहे.
दरम्यान, केंद्राने जाहीर केलेली रक्कम आणि आता असणाऱ्या पूरजन्य परिस्थितीचा दुरान्वये संबंध नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्राने जाहीर केलेल्या नुकसान भरपाईचा पंचनामा केलाय. “2020 मध्ये महाराष्ट्रावर जे नैसर्गिक संकट आले त्यावेळी केंद्राचं पथक पाहणी करण्यासाठी आलं होतं. त्यावेळी 3 हजार 700 कोटींची मागणी करण्यात आली होती. याबाबत कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे. त्यातील हिशोब करुन 700 कोटी मंजूर करण्यात आले. तेही दादाजी भुसे यांनी सांगितले आहे,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
अजित पवार म्हणाले, “आता आम्हीही मुख्यमंत्र्यांचे पत्र दिल्लीत पाठवून रस्ते, शेती, घरे, दुकाने यांच्या झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन नुकसानीचा इत्यंभूत अहवाल तयार करून पाठवणार आहोत. शिवाय केंद्राने या नुकसानीच्या पाहणीसाठी तातडीने टीम पाठवावी अशा पध्दतीने कळवले आहे.” गुजरातला 1 हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले. तशा पध्दतीने महाराष्ट्राला पॅकेज देऊ शकतात. परंतु, तो त्यांचा अधिकार आहे, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.