मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याच्या बातमीने एकच खळबळ उडाली आहे. शरद पवार यांना सोशल मीडियावर दोन जणांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यामध्ये पहिली धमकी ही ‘राजकारण महाराष्ट्राचे’ या फेसबुक पेजवरुन ‘नर्मदाबाई पटर्धन’ नावाच्या आयडीवरुन देण्यात आली आहे. तर दुसरी धमकी ही ‘सौरभ पिंपळकर’ नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर दिली आहे. या धमकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी या प्रकरणी धमकी देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. धमकी देणाऱ्यांपैकी सौरभ पिंपळकर हा तरुण भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप केला जातोय. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी एक फोटोच शेअर केलाय.
शरद पवार यांना धमकी देणारी व्यक्ती भाजपची असल्याचा आरोप केला जात होता. पण हा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेटाळला. धमकी देणं हे आमच्या रक्तात नाही, असं प्रत्युत्तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित आरोपांवर दिलं होतं. त्यानंतर अमोल मिटकरी यांनी शरद पवार यांना धमकी देणाऱ्या सौरभ पिंपळकर सोबतचा चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटोच ट्विट केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये बावनकुळे यांचा उल्लेख करत हे रक्त नेमकं कुणाचं आहे? असा सवाल केला आहे.
“हे आमच्या रक्तात नाही म्हणणारे बावनकुळेजी हे रक्त नेमकं कुणाचं आहे? पवार साहेबांना धमकी देणारा पिंपळकर तुमच्या बाजूला केक कापतोय, ‘राजकारण महाराष्ट्राचे’ ‘नर्मदाबाई पटवर्धन’ सौरभ पिंपळकर हे ट्विटर अकाउंट कुणाच्या रक्ताचे?”, असे प्रश्न अमोेल मिटकरी यांनी उपस्थित केले आहेत. अमोल मिटकरी यांनी केलेल्या या ट्विटवर आता चंद्रशेखर बावनकुळे नेमकी काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हे आमच्या रक्तात नाही म्हणणारे बावनकुळेजी हे रक्त नेमकं कुणाचं आहे? पवार साहेबांना धमकी देणारा पिंपळकर तुमच्या बाजूला केक कापतोय , ‘राजकारण महाराष्ट्राचे’ ‘नर्मदाबाई पटवर्धन’ सौरभ पिंपळकर हे ट्विटर अकाउंट कुणाच्या रक्ताचे?#कराराजवाबमिलेगा@cbawankule pic.twitter.com/G6kBdbnw2O
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 9, 2023
विशेष म्हणजे अमोल मिटकरी यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना फोटो शेअर केलाय. एक व्यक्ती दानवे यांच्याबद्दलचे मत मांडत असल्याचं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. दानवे यांनी आपल्याला सोशल मीडिया संबंधित आयोजित कार्यक्रमाला निमंत्रित केलं होतं, असं त्या फोटोमध्ये लिहिलेलं बघायला मिळत आहे. या फोटोलाही मिटकरी यांनी हे रक्त कुणाचं? असं कॅप्शन दिलं आहे.
#हे रक्त कुणाचं?@cbawankule@raosahebdanve pic.twitter.com/T2BQP4u8IP
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 9, 2023
अमोल मिटकरी यांनी ट्विट केलेल्या फोटोंना आता भाजपकडून काय प्रत्युत्तर देण्यात येतं ते पाहणं महत्त्वाचं आहे. दुसरीकडे राज्याचे मुख्यंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना पूर्ण सुरक्षा देण्याचं आश्वासन दिलं आहे. तसेच शरद पवारांना धमकी देणाऱ्या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.