मुंबईः महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) बरखास्त करण्याच्या हालचालींना वेग आला असून शिवसेना कधीही भाजपसोबत सत्ता स्थापनेचा दावा करू शकते, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेसदेखील सरकार स्थापनेचा प्रस्ताव देईल का, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. या शक्यतांवर विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी थेट उत्तर दिलंय. आम्हाला जनतेनं निवडून दिलं तेव्हा विरोधकांच्या बाकावरच बसवलं होतं. पण महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आम्ही सत्तेत आलो. आता हे तीन पक्षांचं सरकार बरखास्त झालं तर आम्ही भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. .. तर असं समजा की आम्ही विरोधी पक्षात आहोत, असं स्पष्टीकरण अमोल मिटकरी यांनी दिलं. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे नेते, आमदार आणि मंत्र्यांची महत्त्वाची बैठक शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्वर ओक बंगल्यावर घेण्यात आली. त्यानंतर अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना हे स्पष्टीकरण दिलं.
दरम्यान, अमोल मिटकरी यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी एक सूचक ट्विट केलंय. यात त्यांनी गालिबची शायरी वापरली आहे. ती अशी-
गुजर जायेगा ये दौर भी,
जरा सा इत्मीनान तो रख,
जब खुशियाँ ही नही ठहरी,
तो गम की क्या औकात है!!
या शायरीचा नेमका अर्थ काय अशी प्रतिक्रिया विचारली असता अमोल मिटकरी म्हणाले, राज्यावरील हे संकट दूर होऊन भाजपचं स्वप्न पूर्ण होणार नाही.. देवेंद्र फडणवीस कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत… असा त्याचा आशय असल्याचं मिटकरींनी सांगितलं. जोपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार वाचवण्यासाठी पवार साहेब मैदानात आहेत, तोपर्यंत कुणीही काहीही करू शकत नाही, असा विश्वास मिटकरींनी व्यक्त केला.
राज्यातील राजकीय नाट्यावर शरद पवार यांनी घेतलेल्या बैठकीत नेमकं काय घडलं, काय रणनीती आखली गेली, यावर प्रतिक्रिया विचारली असता अमोल मिटकरी म्हणाले, आज शरद पवार यांनी आमच्या मनातील भावना जाणून घेतल्या. हे महाविकास आघाडीवरील संकट आहे. आमच्या सूचना शरद पवार यांनी जाणून घेतल्या. उद्यादेखील आमदारांची एक बैठक बोलावण्यात आली आहे. सरकार बरखास्तीबाबत काही चर्चा झालेली नाही, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीसोबत आहोत. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे.. असं वक्तव्य अमोल मिटकरींनी केलं.