जळगाव | 24 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यात सध्या वाकयुद्ध रंगलं आहे. गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली होती. खडसे आजारपणाचं नाटक करत आहेत, अशी टीका गिरीश महाजनांनी केलेली. त्यावर खडसेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. विशेष म्हणजे यावेळी खडसेंनी थेट महाजनांना जोड्याने मारण्याचा इशारा दिला आहे. “काल गिरीश महाजन यांनी माझ्या आजाराविषयी स्टेटमेंट केलं. मला वाटतं गिरीश महाजनांची साठीबुद्धी नाठी झाली आहे. त्यांचं वय 60 च्या घरात गेलं आहे. त्यामुळे त्यांना काही सूचत नाही, असं वाटतंय. वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना त्यांनी गायनिक विभागाकडे जरा जास्त लक्ष दिलं. त्यांचं हृदय रोगाकडे कमी लक्ष होतं. त्यांना खात्री करायची असेल तर त्यांनी माझे सर्व कागदपत्रे तपासावे. त्यांनी कार्डिआटीक अॅरेस्ट हा काय प्रकार असतो ते पाहून घ्यावं. माझं हृदय बंद पडलं होतं. ते बंद पडलेलं हृदय सुरु करण्यासाठी अथक परिश्रम करावे लागले. एखादा 70-80 लाखांमधून एक माणूस परत येत असतो. त्यातला एक मी आहे. माझ्यासोबत तो चमत्कार घडला. अनेकांचा आशीर्वाद मिळाला. मुक्ताबाईंचा आशीर्वाद माझ्या पाठिशी आहे. पण गिरीश महाजन यांना हे कसं सांगावं?”, असं एकनाथ खडसे म्हणाले.
“गिरीश महाजनांनी वैद्यकीय शिक्षण विभागात चाळे केले, त्यामुळे त्यांची त्या विभागातून हकालपट्टी झाली. गिरीश महाजन यांना माझं आव्हान आहे, त्यांनी माझ्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करावी. माझा आजार खरा आहे की खोटा आहे हे त्यांनी तपासून घ्यावं. माझा आजार खोटा आहे, सहानुभूतू मिळवण्याच्या दृष्टीकोनाने केलं आहे, हे त्यांनी सिद्ध केलं तर गिरीश महाजन यांनी मला भर चौकात जोडे मारावे. गिरीश महाजन खरे मर्द असाल आणि मर्दाचे अवलाद असाल तर हे सगळं पाहिल्यानंतर मी तुम्हाला भर चौकात जोडे मारायला तयार आहे. मला वाटतं गिरीश महाजन माझं हे आव्हान स्वीकारतील आणि जोडे खायला तयार होतील. माझं चुकलं असेल तर मी जोडे खायला तयार आहे. पण गिरीश महाजन यांना नाथाभाऊ नावाचा कावीळ झालाय”, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केला.
“गिरीश महाजन यांनी कापूस प्रश्नांवर बोलावं. कापूस उत्पादक शेतकरी आज अडचणीत आहेत. केळी उत्पादक शेतकरी आज अडचणीत आहेत. मागच्या कालखंडात शहानपणा केला. फडफड करत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना भेटायला गेले. आंदोलकांना आझाद मैदानावर भेटायला गेले. सरकारचे संकटमोचक झाले, आजचं संकट उद्यावर टाळण्यासाठी. कोळी समाजाकडे गेले, धनगर समाजाकडे गेले. आता जाऊन बघा. जरांगे पाटील यांची भेट घेऊन बघा. नुसतं जायचं आणि चमकेशपणा करायचं”, असा घणाघात एकनाथ खडसे यांनी केला.
“हे तुमचं वागणं बरं नव्हं. जरा तपास करा. नाथाभाऊ सिनियर माणूस आहे. त्याला म्हातारपण येणारच आहे. मला वाटतं तुमचे वडीलही म्हातारपणात वर गेले असतील,किंवा तरुणपणात गेले का ते मला आठवत नाही. पण तुम्ही तर 60 वर्षाचे नक्कीच झाला आहात. त्यामुळे जरा सावध राहा. नाथाभाऊ हृदयविकाराच्या धक्क्यातून परत आलेला आहे. नव्या जोमाने, नव्या उत्साहाने कामाला लागलेला आहे. त्यामुळे तुमचे जे काही उद्योग आहेत ते आता हळूहळू बाहेर येतीलच. नाथाभाऊ यमुनेच्या तिरावर बसून हवेत गोळीबार करणार नाही”, असा टोला एकनाथ खडसे म्हणाले.