विधानपरिषदेच्या निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. क्रॉस व्होटिंग झाल्याने पाटील यांचा पराभव झाल्याचं स्पष्ट झालं आहे. काँग्रेसच्या कोट्यातील सात मते फुटली. ही मते महायुतीला गेली. पण शरद पवार गटाचंही एक मत फुटलं आणि त्यामुळे जयंत पाटील यांना पराभूत व्हावं लागलं असं सांगितलं जात आहे. स्वत: जयंत पाटील यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. एवढेच नव्हे तर शरद पवार गटाच्या कोणत्या आमदाराने मतदान केलं नाही, त्याचं नावच जयंत पाटील यांनी जाहीरपणे घेतलं आहे.
जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना या आमदाराचं नाव घेतलं. शरद पवार गटाकडे 12 मते होती. त्यातील 11 मते मला मिळाली. एक मत माझ्या मित्राचं होतं. त्यामुळे माझ्या मतांची संख्या 12 झाली. आमदार मानसिंग नाईक यांचं मत फुटलं. नाईक मतदानाला आयत्यावेळी आले. मिटिंगला आमच्यासोबत होते. मतदान करण्यापूर्वी आम्हाला भेटून गेले. पण मला मत दिलं नाही. कोण कोणाला मतदान करतं ते कळतं. जयंत पाटील, रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड ही पक्षाची भक्कम मते मला मिळाली, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
मला 12 वं मत मिळालं. ते महायुतीतील माझ्या मित्राचं मत होतं. महायुतीतील मित्राने मला मतदान केलं. म्हणजे महायुतीचं एक मत फुटलं, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. आम्ही थोडे बेसावध राहिलो. आमची ताकद कमी आहे, त्यामुळेच हा निकाल आला. माझ्या पराभवाने माझे सहकारी आणि सभागृहही हळहळलं, असं जयंत पाटील म्हणाले.
काँग्रेसची दुसरी पसंती मला होती. मला फक्त तीन मते हवी होती. नाही तर विजय आमचाच होता. महाविकास आघाडीकडे 69 मते होती. समान वाटप झालं असतं तर चित्र वेगळं झालं असतं. काँग्रेसची मते फुटलेली दिसत आहेत. काँग्रेसकडे पुरेशी मते असतानाही काँग्रेसच्या उमेदवाराला दुसऱ्या पसंतीची मते मिळाली हे दुर्देव आहे, असंही त्यांनी सांगितलं.
या निवडणुकीत घोडेबाजार झाला. कुणाला वर्क ऑर्डर मिळाल्या. कुणाला पैसे मिळाले असं मी ऐकतोय. 20 कोटी रक्कम मिळाल्याची चर्चा आहे. मी एवढी मोठी रक्कम एकत्रपणे कधी पाहिली नाही, असं सांगतानाच निवडणुकीचा अंदाज आल्यानंतर मी मतदान केंद्राबाहेर पडलो होतो. निकाल काय लागेल एव्हाना लक्षात आले होते, असंही ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत काय चित्र असेल यावरही जयंत पाटील यांनी भाष्य केलं. महायुतीसाठी विधानसभा सोपी नाही. महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत 180 जागा मिळतील, असा दावा करतानाच आता भाजपवाले चंद्रावरही सत्ता स्थापन करतील, असा चिमटाही त्यांनी काढला.