मी अजित अनंतराव पवार, गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की… अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री; पद आणि गोपनीयतेची घेतली शपथ

| Updated on: Jul 03, 2023 | 10:43 AM

राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राजभवनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांना पद आणि गोपीनयतेची शपथ घेतली.

मी अजित अनंतराव पवार, गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की... अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री; पद आणि गोपनीयतेची घेतली शपथ
ajit pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राजभवनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांनी अजितदादांना पद आणि गोपीनयतेची शपथ दिली. अजित पवार यांच्या शपथविधीमुळे राज्यात नवीन राजकीय समीकरण तयार झाले आहे. राज्यात राष्ट्रवादी, शिंदे गट आणि भाजपची युती झाली आहे. अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर महायुतीचं बळ वाढलं आहे.

अजित पवार यांना राज्यपाल रमेश बैस यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यानंतर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील. हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. आज एकूण 9 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत या सर्व मंत्र्यांचे खाते वाटप करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

शपथ घेणारे मंत्री

अजित पवार, उपमुख्यमंत्री

छगन भुजबळ, कॅबिनेट मंत्री

दिलीप वळसे पाटील

हसन मुश्रीफ

धनंजय मुंडे

धर्मराव बाबा अत्राम

आदिती तटकरे

संजय बनसोडे

अनिल पाटील

चर्चेवरून शपथविधीकडे

दरम्यान, अजित पवार यांच्या निवासस्थानी सकाळपासूनच भाजप आणि शिंदे गटात जाण्याची चर्चा सुरू होती. या बैठकीला राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित होते. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह अमोल कोल्हेही यावेळी उपस्थित होते. अजित पवार यांना प्रदेशाध्यक्षपद मिळालं नाही. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. अजित पवार यांना समजावण्यासाठीच आमदारांनी त्यांच्या घरी धाव घेतली असावी, अशी चर्चा होती.

अन् अजित पवार राजभवनात आले

मात्र, अजित पवार हे राजभवनाकडे गेल्यानंतर राज्यात काही तरी मोठं घडतंय याची जाणीव मीडियाला झाली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही राजभवनात आल्याने राष्ट्रवादीत फूट पडल्याचं निश्चित झालं. अजित पवार यांनी 30 आमदारांच्या सह्यांची यादी राज्यपालांकडे दिली. त्यानंतर अजित पवार यांचा शपथविधी पार पडला.

पवारांचा पाठिंबा नाही

दरम्यान, अजित पवार यांच्या शपथविधीशी राष्ट्रवादीचा काहीच संबंध नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर आता शरद पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचं शरद पवार यांच्याशी बोलणं झालं. या बंडाशी संबंध नाही. मी खंबीर आहे, असं शरद पवार यांनी राऊत यांना सांगितल्याचं राऊत यांनी ट्विट करून सांगितलं आहे.