मुंबई: ओबीसी (obc) समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे आहे. त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी 27 टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी दिली आहे. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत आपण सर्वचजण आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सनदशीर मार्गाने सर्व प्रयत्न केले आहेत. यापुढेही करत राहू, असे आश्वासनही जयंत पाटील यांनी यावेळी दिले आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते. हा संवाद साधताना त्यांनी मोठी घोषणा केली आहे. यापूर्वी भाजपनेही ओबीसी उमेदवारांना 27 टक्के जागा देणार असल्याची घोषणा केली होती.
ओबीसी आरक्षणाशिवाय येणाऱ्या निवडणूका होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर घोर अन्याय आहे. आरक्षणाशिवाय निवडणूका होऊ नये अशी राष्ट्रवादीची भूमिका असल्याचेही जयंत पाटील यांनी अगोदरच जाहीर केले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही कालच परळी नगर परिषदेत ओबीसींना 27 टक्के जागा देणार असल्याचं जाहीर केलं आहे. राज्यातील 92 नगर परिषदेच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय राज्य निवडणुका आयोगाने घोषित केल्या आहेत. या निवडणुका ओबीसींच्या आरक्षणाशिवाय होत असल्या तरी राजकीय आरक्षणाचा निर्णय जो काही येईल तो येईल. आम्ही परळी नगर परिषद निवडणुकीत ओबीसी उमेदवारांना 27% जागा देणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी जाहीर केले आहे.
दोनच दिवसांपूर्वी राज्यातील 92 नगर परिषदा व 4 नगर पंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. याच दरम्यान ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने समन्वय साधून तात्काळ मार्गी लावावा व त्यानंतरच राज्यात निवडणुका घ्याव्यात अशी भूमिका धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली होती. मात्र राजकीय प्रवाहात ओबीसींचे स्थानिक इच्छुक उमेदवार यांच्यावर अन्याय होणार नाही याचा विचार करून आरक्षणाचा निकाल जो येईल व जेव्हा येईल तेव्हा बघून घेऊ. मात्र आम्ही परळी नगर परिषद निवडणुकीत 27% जागा ओबीसी उमेदवारांना देणार असल्याची घोषणा मुंडे यांनी केली आहे. धनंजय मुंडे हे परळीचे आमदार असून परळी नगर परिषद त्यांच्या नेतृत्वाखाली मागील 10 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने परळीत 32 पैकी 25 जागा जिंकल्या होत्या.