मुंबई | 22 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पुढच्या महिन्यात 12 डिसेंबरला वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादीकडून जंगी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. शरद पवार गटाकडून जाहीर सभेचं आयोजन केलं जात आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत एकत्रितपणे ही सभा घेण्याचा शरद पवार गटाचं नियोजन सुरु असल्याची माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. पण याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही, असं आव्हाड यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. “12 तारखेला शरद पवार यांचा वाढदिवस आहे. त्या दिवशी प्रयत्न आहे की, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांना एकत्रित करून सभा घ्यायची. त्यात शरद पवार तर असतीलच. यावेळी सगळ्या पक्षांना एकत्र करून सभा घ्यायची, असा प्रयत्न आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आता या प्रकरणावर नियमित सुनावणी पार पडत आहे. दरम्यान, काल झालेल्या सुनावणीवेळी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी आपली साक्ष नोंदवताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख केला होता. पण तो उल्लेख रेकॉर्डवर घेतला गेला नाही, असा दावा ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केला. यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली.
“सुनील प्रभू यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला, तो उल्लेख विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी इंग्लिश ट्रान्सलेशनमध्ये घेतला नाही. त्यावर प्रभूंचे वकील कामत यांनी आक्षेप घेतला. अध्यक्षांशी वाद झाला. सुनील प्रभूंनी आपली जबानी देताना साक्ष देताना बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख केला. इंग्लिश ट्रान्सलेशन हेच जशाच्या तसं झालं पाहिजे आणि हे लक्षात घेता आलं पाहीजे की नार्वेकर हे आता स्पीकर नाहीत”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“या प्रकरणात तेव्हा ते जज होते. हे वारंवार सुप्रीम कोर्टाने सांगण्याचा प्रयत्न केलाय. महाराष्ट्राच्या प्रकरणात तुम्ही स्पीकर नाही तर यु आर द स्पिकिंग जज आहात. तरीही त्यांच्या हातून अशी चूक होणं हे अक्षम्य आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव हे मराठीत येतं, मराठीतून घेतलं जातं, तर त्याची तिथं नोंद होते. ट्रान्सलेशन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बाजूला सारलं जातं, त्यांचं नाव घेतलं तिथून गायब केलं जातं. तसंही त्यांना संविधान बदलायचं असेल, त्यांनी आत्तापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव बाजूला करायला सुरुवात केली असेल”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.